काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का ; आमदारकी रद्द….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. खालच्या कोर्टात हस्तक्षेप करण्यास नकार देत शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाच्या या आदेशामुळे केदार यांच्या आगामी निवडणुका लढवण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आमदारकी रद्द
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा तसेच साडे बारा लाख रुपयांचा दंड ठोटावण्यात आला होता. त्यामुळे विधानसभाध्यक्षांनी राज्यघटनेच्या कलम 191 (1) व लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 83 (3) अन्वये सुनील केदार यांना आमदार म्हणून अपात्र ठरविले होते. त्यानुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली होती. बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता शिक्षेला स्थगिती मिळावी अशी याचिका सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात केली होती. त्यात ही दिलासा न मिळाल्याने आता सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.
परंपरागत सावनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढता यावी यासाठी सुनील केदार यांनी शेवटचा पर्याय म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. या संदर्भात शुक्रवारी (दि. 26) सुनावणी झाली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 152 कोटींच्या रोखे घोटाळ्यात केदार यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द झाली व पुढील निवडणूक लढविण्यास त्यांच्यावर प्रतिबंध आला. उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत दिलासा न दिल्याने केदार व समर्थकांना सर्वोच्च न्यायालयाचाच आधार होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के.व्ही विश्वनाथन यांच्यासमोर सुनावणीत केदार यांची याचिका फेटाळण्यात आली.
डिसेंबर 2023 मध्ये नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात नागपूरच्या सत्र न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह पाच जणांना पाच वर्षाची शिक्षा व साडेबारा लाख रुपयांचा दंड ठोठावला. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली. कुठलीही निवडणूक लढवण्यास केदार यांच्यावर सहा वर्षाचा प्रतिबंध घालण्यात आला. सत्र न्यायालयापुढे त्यांनी दोषसिद्धीला स्थगिती आणि जामिनासाठी अर्ज केला तो फेटाळण्यात आल्याने त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र उच्च न्यायालयाने दोषसिद्धी कायम ठेवत त्यांना जामीन मंजूर केला.
दोषसिद्धीला स्थगिती मिळाल्यास त्यांची आमदारकी बहाल होईल व त्यांना पुढील काही महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सहभागी होता येईल अशी आशा असताना उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळत धक्का दिला. आता सर्वोच्च न्यायालयानेही जबर धक्का दिला. आता केदार यांचे राजकीय भवितव्य असे असेल याच्या चर्चा रंगल्या आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात त्यांनी आपले समर्थक श्यामकुमार बर्वे या निष्ठावंत उमेदवाराला खासदार केल्यानंतर राजकीयदृष्ट्या महायुती विरुद्ध केदार असा सामना चर्चेत आला. विधानसभा निमित्ताने केदार यांची दुसऱ्यांदा राजकीय कसोटी लागणार आहे.