राज ठाकरे-मोदी एकाच मंचावर ; मुंबईच्या शिवाजी पार्कात तोफ धडाडणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहे. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या सभेत जनतेला संबोधित करणार आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीची मुंबईत सांगता सभा होणार आहे. यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत, त्यांचा मुंबईत रोड शो देखील होईल.
राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी 17 मे रोजी मुंबईत भव्य सभा पार पडणार आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रचाराच्या दृष्टिकोनातून ही सभा खूप खास असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्क मैदानावरील भव्य मंचावरून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील जनतेला संबोधित करणार आहेत.
मुंबईच्या शिवाजी पार्कात तोफ धडाडणार
मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते वागीश सारस्वत यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे. निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान बुक करण्यात आलं होतं. पण राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. महायुतीच्या सर्व लोकसभा उमेदवारांच्या समर्थनार्थ मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिंगणात उतरले आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होणार आहे.
पंतप्रधान मोदींचा मुंबईमध्ये रोड शो आणि शिवाडी पार्कात भव्य सभा
तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राज ठाकरे यांनी कणकवलीत भाजप उमेदवार नारायण राणे यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित केलं होतं. आता 10 मे रोजी पुण्यात आणि 12 मे रोजी ठाणे जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील लोकसभेच्या जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी, 17 मे रोजी संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा होईल. शिवाजी पार्क मैदानाच्या मंचावरून राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस वागीश सारस्वत यांनी दिली आहे.