वसंत मोरे पुण्यातून मविआचे उमेदवार…? धंगेकर म्हणतात, मी माघार घ्यायला तयार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातल्या 20 जणांची नावं आहेत. भाजपाने या यादीत पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.
त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा कोणता नेता असेल हे पाहणे महत्त्वाचे असेल. तर दुसरीकडे पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर आणइ मोहन जोशी यांच्या नावानंतर आता वसंत मोरेंचेही नाव चर्चेत आले आहे. वसंत यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच पुण्यात वॉशिंग मशीन नको म्हणून मविआच्या नेत्यांची भेट घेतोय असे सूचक वक्तव्यही केले आहे. अशातच आता काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांची पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे.
वसंत मोरे मविआ नेत्यांची भेट आहेत, याचपार्श्वभूमीवर बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, वसंत मोरे काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. कारण भाजपाने पुणे लोकसभा मतदारसंघातून मित्रपक्षाचा विचार न करता उमेदवारी घोषित केली. परंतु काँग्रेस मित्रपक्षांचा विचार करून निर्णय घेणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून मी काँग्रेसचा उमेदवार नाही, पक्षाने अद्याप तसं जाहीर केलेलं नाही. परंतु माझ्यासह 20 जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठिशी मी उभा राहायला तयार आहे. कारण मी काँग्रसेचा कार्यकर्ता आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केलं.
वसंत मोरेंबाबत बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, वसंत मोरे आणि मी एका पक्षात काम केले आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्ष घेत असतो. सध्या पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांची गरज आहे, त्यामुळे पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील. ते ज्याला उमेदवारी देतील त्याच्यामागे मी उभा राहणार आहे. मी मित्रासाठी नाही तर काँग्रेस पक्षासाठी माघार घ्यायला तयार आहे, असं सूचक वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केलं.