भाजपच्या दुसऱ्या यादीत आश्चर्यचकित करणारे ४ नावं, या आमदाराला इच्छा नसतानाही तिकीट..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या ७२ उमेदवारांची दुसरी यादी भारतीय जनता पक्षाने आज घोषित केली. त्यात विदर्भाच्या चार जागांचा समावेश असून नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व वर्धेतून रामदास तडस यांच्यावर पक्षाने परत विश्वास व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे अकोल्यातून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनूप धोत्रे यांना लॉटरी लागली आहे. तर, चंद्रपुरात इच्छा नसतानाही सुधीर मुनगंटीवारांना रणमैदानात उतरावे लागणार आहे.
दहा दिवसांपूर्वी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी घोषित केली होती. १९५ उमेदवारांच्या या यादीत महाराष्ट्राचा समावेश नव्हता. पण नितीन गडकरी यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचे नाव पहिल्या यादीत नसल्याने राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी असल्याने व गेल्या दहा वर्षांमध्ये गडकरींनी देशभरात उभे केलेले रस्तेविकासाचे काम बघता गडकरींचे नाव पहिल्याच यादीत असेल, अशी अपेक्षा होती.
मात्र तसे न झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. हा गडकरींचा अपमान आहे व त्यामुळे त्यांनी भाजपा सोडून शिवसेना (उबाठा) पक्षात यावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी करून टाकले होते. मात्र, आता गडकरींची उमेदवारी घोषित झाल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
घोषित झालेल्या चार नावातील एक आश्चर्यकारक नाव आहे, सुधीर मुनगंटीवार यांचे. चंद्रपूर मतदारसंघातून २०१९पर्यंत भाजपाचा खासदार होता. हंसराज अहीर तेथून निवडून यायचे. २०१९ मध्ये ते पराभूत झाले. यावेळी भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लढण्याचे निर्देश दिले आहे. विशेष म्हणजे सुधीरभाऊंची राज्याचे राजकारण सोडून दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती. तसे त्यांनी वारंवार स्पष्ट केले होते. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या एका सभेत बोलतानाही सुधीरभाऊंनी तसे जाहीररीत्या बोलून दाखवले होते. त्यानंतरही पक्षाने त्यांना चंद्रपुरातून लढण्याचे आदेश दिले आहेत.
अकोल्यातून घोषित झालेले अनूप धोत्रे यांचे नाव अनेकांना चकित करणारे ठरले. अनूप यांचे वडील संजय धोत्रे हे अकोल्याचे विद्यमान खासदार आहेत. सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळातही ते काही काळ होते. मात्र गेले काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांचा संपर्क कमी झाला होता. त्यामुळे ते यावेळी उभे राहणार नाहीत, याबाबत निश्चितता होती. त्यांच्या जागी पक्षाने त्यांच्या मुलाला, अनूप याला उमेदवारी देऊन अकोल्याचा वारसा त्यांच्या घरातच कायम ठेवला.
आजवर कोणत्याही प्रकारची निवडणूक न लढवता एकदम लोकसभेची उमेदवारी ४० वर्षीय अनूप धोत्रे यांच्या झोळीत पडली आहे. वर्धेतून विद्यमान खासदार रामदास तडस यांना परत उमेदवारी मिळाली आहे. तेथेही पक्ष दुसरा उमेदवार देईल, अशी चर्चा होती. मात्र ती खोटी ठरली व पक्षाने तडसांवरच विश्वास दाखवला.
भंडारा, गडचिरोलीचे काय?
भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर या मतदारंघात सध्या भाजपचे खासदार आहेत. त्यांची नावे आज घोषित झालेल्या दुसऱ्या यादीतही नाहीत. त्यामुळे भंडाऱ्याचे सुनील मेंढे व गडचिरोलीचे अशोक नेते यांच्या उमेदवारीबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या बुलढाणा, अमरावती, वाशीम-यवतमाळ व रामटेक या चार मतदारसंघाबाबतही अजून अनिश्चितता आहे. हे चारही मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार की त्यातील काही मतदारसंघ आपल्याकडे घेऊन भाजपा तेथे उमेदवार देतील, याबाबतही अजून साशंकता आहे.