उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा ; उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमोल कीर्तीकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्यभर राज्यभर दौरे सुरू केले आहेत. पक्ष, चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी परत पक्षबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केलीय.
याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी मुंबईत शिंदे गटावर पहिला मोठा डाव टाकला आहे. त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर सध्या शिंदे गटात आहे.
महायुतीचा उमेदवार कोण
सध्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून गजानन कीर्तीकर हे शिंदे गटाचे खासदार आहेत. अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, अमोल कीर्तीकरला तुमच्याकडे दिलाय. जबाबदारी तुमची आहे हे लक्षात ठेवा. मी प्रचाराला येणार नाही, थेट विजयी सभेला येणार असल्याचं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे. अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.