भाजपकडून सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब, नेत्याचं मोठं वक्तव्य….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे यावेळी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर या मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे.
राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या मैदानात असणार आहेत. त्यामुळे यंदा बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पवार असा सामान रंगणार आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ?
बारामती लोकसभा निवडणुकीत यंदा सुनेत्रा पवार याच बाजी मारणार आहेत, महायुतीला याबाबत विश्वास असल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे. चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यामुळे एकप्रकारे महायुतीकडून बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांनी लोणावळ्यात “रन फॉर नेशन, रन फॉर मोदी” मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला, त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
दरम्यान भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच्या नावाचा समावेश नाहीये, यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे, तर दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात आला आहे, यावर बोलताना चित्रा वाघ यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष पातळीवर निर्णय घेतला जाईल असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.