वाशिम जिल्ह्यात आणखी पाच करोनाबाधित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाशीम :
वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील करोनाबाधित महिलेसोबत मुंबईहून आलेल्या सहा जणांपैकी पाच जणांना करोना तपासणी अहवाल आज, मंगळवारी सकारात्मक आला आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सकारात्मक नमुन्यांची संख्या आता आठ झाली आहे.
मूळ मालेगाव तालुक्यातील व कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील महिलेला करोना संसर्गाची लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे या कुटुंबाने स्वत:हून मुंबई येथील खासगी प्रयोगशाळेत महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी दिले. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच हे कुटुंब मुंबई येथून वाशिमकडे रवाना झाले. मात्र, वाशिम जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच शनिवारी त्या महिलेचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आल्याचे कळले.त्यामुळे हे कुटुंब थेट वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले.
वाशिम जिल्ह्यात इतर कोणाशी संपर्क आलेला नाही. करोनाबाधित महिलेसोबत मुंबई येथून आलेल्या सहा जणांना रुग्णालयातील अलगीकरण कक्षात दाखल करून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी अकोल्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच अहवाल आज, मंगळवारी सकाळी प्राप्त झाले. या पाचही जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. याच कुटुंबातील एका व्यक्तीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
१२ अहवाल अप्राप्त
वाशिम जिल्ह्यात गृह विलगीकरणात ४१ जण आहेत, तर संस्थात्मक विलगीकरणात तिघांना दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील अलगीकरण कक्षात १७ जण दाखल आहेत. आतापर्यंत ११९ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, ९९ नकारात्मक, तर आठ सकारात्मक आले आहेत. दोघांना सुटी देण्यात आली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. १२ अहवाल अद्यााप अप्राप्त आहेत.