भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री ; छत्तीसगड, मध्य प्रदेश प्रमाणेच भाजपाचे धक्कातंत्र…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जयपूर :- छत्तीसगड, मध्य प्रदेश प्रमाणेच भाजपाने राजस्थानमध्ये नेतृत्व बदल केला असून भजनलाल शर्मा यांना नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. यामुळे आता वसुंधरा राजे पर्वाचा शेवट झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
३ डिसेंबर रोजी राजस्थान आणि इतर तीन राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला होता. तेव्हापासून मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय होत नव्हता. त्यानंतर पहिल्यांदा छत्तीसगडचा मुख्यमंत्री ठरवला गेला. तेव्हाच भाजपा वर्तमान नेतृत्वात बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे निश्चित झाले.
आज दुपारपासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरविण्यासाठी मॅरेथॉन बैठक सुरू होती. केंद्रीय निरीक्षक आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांड्या यांनी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केली. दुपारी २ वाजता राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह जयपूर येथे आले. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार समजल्या जाणाऱ्या वसुंधरा राजे यांनी त्यांचे स्वागत केले. ‘राजस्थानमधील भाजपा आमदारांची आज बैठक घेऊ आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला नवा मुख्यमंत्री मिळेल’, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी दुपारी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. त्याआधीच मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा झाली.