तीन राज्यांत भाजपचा विजय; अजित पवार म्हणाले, ‘देशाला मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशातील राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांचा निकाल जवळपास स्पष्ट होत आला असून, भाजप बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे, तर तेलंगणामध्ये केसीआर यांच्या हातातून सत्ता निसटत काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे.
भाजपला तीन राज्यांत बहुमत मिळत असल्याने ‘एनडीए’तील नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. या अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच भाजपचा चेहरा मोदीच आहेत हे त्रिवार सत्य असून, नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असं ते म्हणाले आहेत.
“मी आधीच म्हटलं होतं, की निकाल चांगलाच लागेल. पंतप्रधान मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या तीन राज्यांतील लोकांनी भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे जनतेचा कौल मान्य केला पाहिजे. मात्र, ‘इंडिया आघाडी’वाले आता ‘ईव्हीएम’बाबत बोलतील, पण जनतेने भाजपवर आत्मविश्वास दाखवला आहे. मोदी दिलेला शब्द पाळतील, असा विश्वास आहे. कारण गेल्या दहा वर्षांत मोदींनी अनेक चांगली कामं केली आहेत, असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत असून, गेल्या दहा वर्षांत त्यांनी अतिशय चांगल्या योजना राबवल्या आहेत, पण या निवडणुकीत काहींनी नको तेवढा आत्मविश्वास दाखवला,” असा टोलाही उपमुख्यमंत्री पवार यांनी विरोधकांना लगावला. तसेच मोदींपुढे दुसरा कोणीही चेहरा नाही, असेही पवार म्हणाले.
याचवेळी तेलंगणामध्ये काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत आहे, याबाबत बोलताना अजित पवार यांनी काँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी हे एबीव्हीपीचे कार्यकर्ते होते. मात्र, काँग्रेसने त्यांना त्यांच्याकडे घेतले, अन्यथा तेलंगणातदेखील आज चित्र वेगळं असतं, असं मोठं विधान त्यांनी केलं.