अरे देवा! सोंगताना वाचवलं, पण ऐन विकताना गाठलचं…
शेतमाल भिजला पावसात ; वाशीमची घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ऐन सोयाबीन सोंगणीच्या वेळी परतीचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे जिवाचे रान करून काही प्रमाणात सोयाबीनचे पीक वाचविले. मात्र, त्यानंतर हेच सोयाबीन बाजार समितीत विक्रीस आणल्यानंतर अखेर पावसाने गाठून ओले केलेच. त्यामुळे सोंगताना वाचविलेलं पीक विकताना ओलं केल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटल्या.
जिल्ह्यात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. गतवर्षी ऐन सोंगणीच्या काळातच पावसाने मुक्काम ठोकला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले होते. मात्र, अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पीक वाचविले. मात्र, हेच घरातील सोयाबीन बुधवारी (ता.13) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणले.मात्र, दुपारनंतर अचानक सोसाट्याची हवा, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला.या पावसामुळे बाजार समितीच्या आवारात खाली टाकलेले शेकडो क्विंटल सोयाबीन पावसात भिजल्या गेले. यामध्ये काही सोयाबीन लिलावानंतर मोजण्यासाठी पोते भरले जात होते. मात्र, ऐनवेळी आलेल्या पावसामुळे कुणाला काहीच करता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिवाचे रान करून जपलेले सोयाबीन अखेर बाजार समितीत विक्री करताना ओले झाले. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळा
अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीच्या आवारात विक्रीस आलेला शेतमाल ओला झाला. त्यामुळे या शेतमालाचा लिलाव करताना व्यापाऱ्यांनी तो पाडून घेऊ नये, नसता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. ही बाब पाहता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने पावसात ओल्या झालेल्या शेतमालाला दुखील योग्य दर देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात आली आहे.
का भीजतो शेतमाल पावसात!
येथील बाजार समितीमध्ये कृषी माल लिलावासाठी टिनशेडचे ओटे उभारण्यात आले आहेत. मात्र, या ओट्यांवर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना विक्रीस आणलेला शेतमाल खाली रस्त्यावरच टाकावा लागतो. त्यामुळे अचानक पाऊस आल्यास शेतकऱ्यांचाच शेतमाल ओला होऊन, त्याचे नुकसान होते.