अजितदादा, मुख्यमंत्रिपद अन् राष्ट्रवादी, राजकीय भूकंपावर फडणवीस अखेर बोलले…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच भूकंप होणार असल्याचं भाकीत मागच्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. अजित पवार नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांसह सत्तेत सहभागी होतील, असे दावे केले जात आहेत.
खुद्द अजित पवार यांनी हे दावे फेटाळून लावले, पण त्यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. 2024 कशाला आमचा आताच मुख्यमंत्रीपदावर दावा असल्याचं अजित पवार म्हणाले. एवढच नाही तर एकनाथ शिंदे सध्या तयार होत आहेत, ते तयार होईपर्यंत त्यांचं पद जाईल, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवार यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी अजितदादांची मुलाखत पाहिली नाही, कोणालाही मुख्यमंत्री व्हायला आवडू शकतं. मुख्यमंत्री व्हायला आवडणं हे काही वावगं नाही. अनेकांना मुख्यमंत्री व्हायला आवडतं पण होता येतं असं नाही, आमच्या अजितदादांना शुभेच्छा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राजकीय भूकंपाचं भाकीत पाहून माझंदेखील मनोरंजन होत होतं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
भाजप संजय राऊत आणि अजित पवारांमध्ये भांडण लावत आहे, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस मिश्कील हसले. भांडण लावायला लागतं का? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. अजित पवारांना महाविकासआघाडीमधून हाकलण्यासाठी प्रयत्न सुरू आहे का? हे मला माहिती नाही. पण ते जी वज्रमूठ म्हणत आहेत, त्याला इतक्या भेगा आहेत की वज्रमूठ कधी होऊ शकत नाही, त्याचाच प्रत्यय येत आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.