अजितदादा ‘मविआ’चे आधारस्तंभ, ते कुठंही जाणार नाहीत ; संजय राऊतांचा दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँगेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातंय.
तसंच लवकरच पवार हे भाजपसोबत जातील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
याच दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राऊत म्हणाले, सध्या राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, अजितदादा मविआचे आधारस्तंभ आणि महत्वाचे नेते आहेत, त्यामुळं ते कुठंही जाणार नाहीत. ते भाजपात जाणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट करत मविआ मजबूत असल्याचं सांगितलं.
आजही पक्ष शरद पवार यांच्या नावाशी बांधिल आहे. आजही शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाशी बांधिल आहे. आमदार फुटल्याच्या बातम्या हे अंतिम सत्य नसल्याचे राऊत म्हणाले. अजित पवार यांच्याबाबत प्रसिद्ध केलेल्या बातम्या भाजप तयार करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. राष्ट्रवादीकडं सध्या स्थितीला 53 आमदार आहे. तर, पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज आहे. आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहे. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडं दिल्या असल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलंय. त्यामुळं अजित पवार भाजपसोबत जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु, संजय राऊत यांनी अजित पवार कुठेही जाणार नसल्याचं म्हटलंय.