स्वयंपाकाचा भार पुन्हा चुलीवरच
- मार वाढत्या महागाईच्या गॅस सिलेंडरच्या किमती भिडल्या गगनाला
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
अर्जुनी-मोर / संतोष रोकडे
गोंदिया – चुलीच्या धुरापासून महिलांची मुक्तता व्हावी तसेच महिलांना चुलीवरच्या स्वयंपाकामुळे डोळ्यांना इजा होऊ नये यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अंतर्गत हजारो कुटुंबांना गॅस जोडणी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यासह ग्रामीण भागातील कुटुंबाना याचा लाभ मिळाला आहे. शासनाने मोठा गाजावाजा करत हि योजना अमलात आणून प्रथमतः गॅस सिलेंडरचा पुरवठा सुद्धा केला मात्र दिवसेंदिवस सिलेंडरच्या वाढल्या किमतीने स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे. जानेवारीमध्ये गॅस सिलेंडरची किंमत सातशे रुपये होते तर फेब्रुवारी मध्ये सिलेंडर च्या किमती वाढून 923 रुपयांच्या घरात गेली मात्र मार्च महिन्यात शासनाने थोडा दिलासा किंमत 870 रुपये करण्यात आल्याने पुन्हा पारंपारिक गृहिणी वडत असल्याचे चित्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
केंद्र शासनाच्या उज्वला गॅस योजनेचा जिल्ह्यातील अनेक गोरगरीब नागरिकांना लाभ मिळाला परंतु सिलेंडरच्या सततच्या वाढत्या किमतीमुळे ग्रामीण भागातील नागरिक या सिलेंडरचा वापर केवळ चहा करण्यासाठी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी स्वयंपाक किंवा नाश्ता करण्यासाठी करीत आहेत वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना महिला दिसून येत आहेत. गॅस सिलेंडरच्या वाढत्या महागाईमुळे खेडेगावातून पुन्हा चुलीच पेटू लागल्या आहेत गॅस मिळालेल्यांना शासनाने राकेल बंद केल्याने गृहिणी गोवऱ्या तसेच सरपनाकाडे वळलेल्या आहेत.
महिलांना धुरापासून मुक्तता मिळावी व त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे व मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबून पर्यावरणाचे संतुलन बरोबर राहावे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने उज्वला गॅस योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत फक्त शंभर रुपयात गॅस जोडणी मिळत असल्याने सुरुवातीला या योजनेला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला मात्र दिवसेंदिवस वाढत्या किमती मुळे सिलिंडरची मागणी हळूहळू कमी होत गेली आणि पुन्हा चुली धूर फेकू लागल्या आहेत. अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीतील दरवाढ आवाक्याबाहेर गेल्याने सिलेंडर पेक्षा आपली चुलच बरी अशी भावना आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधील गृहिणी मध्ये तयार झाली ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करुन इंधनाचा वापर केला जातो यामुळे वायू प्रदूषणा बरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना अतिशय त्रास होतो यामुळे डोळ्यांचा व श्वसनाचा आजार होऊन आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो यामुळे सिलेंडरचे दर कमी करण्याची मागणी महिला वर्गातून केली जात आहे.
- केरोसीन बंद तर गॅस सिलेंडर हंडे अडगळीत
शासनाकडून प्रधानमंत्री उज्वला गॅस जोडणी योजनेअंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली या योजनेअंतर्गत बहुतांश ग्रामीण भागातील घरात गॅस जोडणी दिली मात्र त्यामुळे त्या कुटुंबाचा रेशन कार्ड वरील केरोसीनचा पुरवठा बंद झाला केरोसीन मिळेना गॅस सिलेंडरचे भाव वाढले त्यामुळे सिलेंडर खरेदी करणे महागात पडत आहे. परिणामी ग्रामीण भागातील अनेक सिलेंडर अडगळीत पडले असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे गृहिणी पुन्हा पारंपरिक चुलीवरच स्वयंपाक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.