शेतकऱ्यांनो काळजी घ्या…! राज्यात अवकाळी पावसासह तुफान गारपीटीची शक्यता ; या जिल्ह्यांना अलर्ट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्री थंडीची हुडहुडी जाणवत आहे. त्यातच आता हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढावलं आहे. दुसरीकडे गाटपीट होण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
देशाच्या वायव्य दिशेकडून बंगालच्या उपसागरात सागराहून वारे वाहत आहेत. तसेच अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हवामान खात्याने आजपासून ६ मार्चपर्यंत राज्यातील काही भागात अवकाळी पावसासह (Weather Updates) तुफान गारपीटीचा इशारा दिला आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांत कोसळणार पाऊस?
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, प्रत्यक्षात सोमवार दिनांक ६ मार्च संध्याकाळपासून ते बुधवार दिनांक 8 मार्चपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, येवला, नांदगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तसेच खान्देश, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसाबरोबर गारपीटची शक्यता
दरम्यान, पावसाबरोबरच (Weather Forecast) गारपीट देखील होऊ शकते, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पाऊसाचा जोर कमी असला तरी, गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेगही कदाचित जास्त असू शकतो. असे वातावरण निर्माण झाल्यास त्याला आपण वावधन म्हणतो, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
विदर्भातही सर्वत्र पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणात देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे.