भंडाऱ्यातील ‘गवराळा’ गावात 30 वर्षांपासून रंगपंचमी खेळली जात नाही, कारण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भंडारा :- केवळ भारतातच नव्हे तर, विदेशातही होलीकोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो.
मात्र, भंडाऱ्यातील (Bhandara) लाखांदूर तालुक्यातील गवराळा हे एक गाव आहे, जिथ मागील 30 वर्षांपासून होळी उत्सवात (Holi Festival) रंग खेळले जात नाहीत. या दिवशी संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येत होळीच्या तीन दिवसात श्रमदान करतात. गाव स्वच्छ करुन गोळा झालेल्या कचऱ्याची होळी पेटवतात. यातून वृक्ष तोडीवर आळा बसवण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच लोकवर्गणीतून भजन कीर्तन, पालखी सोहळा, रक्तदान, ग्रामगीता प्रवचन आणि सामूहिक महाप्रसाद करतात.
‘हे’ आहे रंगपंचमी न खेळण्यामागचं कारण!
गवराळा गावातील नागरिक का बरं होळीत रंगोत्सवात सहभागी होत नाहीत किंवा रंग खेळत नाहीत, हे जाणून घेऊया. 1985 मध्ये गवराळा गावात हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सानिध्यात वास्तव्य करणारे तुकाराम दादा यांच्यासोबत राहणारे कर्मयोगी किसनबाबा अवसरे महाराज (Kisanbaba Avsare Maharaj) आले होते. मंदिराचं बांधकाम करताना अवसरे महाराजांनी संपूर्ण ग्रामस्थांना मूलमंत्र देत, जातीभेद नष्ट करण्यासोबतच एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहण्याची शिकवण दिली. कालांतराने 1992 मध्ये अवसरे महाराजांचं निधन झालं आणि तो दिवस होता होळीच्या रंगपंचमीचा. महाराजांच्या निधनाने संपूर्ण ग्रामस्थ शोकसागरात बुडाले आणि त्या दिवशी गावात कुणीही रंग खेळला नाही किंबहुना कुणाच्या घरी चुलीही पेटल्या नाहीत. तेव्हापासून आता 30 वर्षांचा कालावधी लोटला या गवराळा गावात रंगपंचमी खेळली जात नाही.
अवसरे महाराजांची स्मृती जपण्यासाठी होळीनिमित्त तीन दिवस विविधी कार्यक्रम
किसनबाबा अवसरे महाराज यांच्या स्मृती जपण्यासाठी ग्रामस्थ होळीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन करतात. वृक्ष तोडीवर आळा बसावा म्हणून सगळे गावकरी एकत्र येत संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करतात. कचरा गोळा करतात आणि त्याचं दहन करुन होळी साजरी करतात. मात्र, रंग कुणीही खेळत नाही. होळीच्या तीन दिवसात अवसरे महाराजांची स्मृती जपण्यासाठी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा आयोजित करण्यात येतो. यात ग्रामगीता प्रवचन, भजन कीर्तन, पालखी सोहळा, प्रदक्षिणा, मौन श्रद्धांजली, रक्तदान, नेत्रदान शिबिराचं आयोजन करुन महाराजांना अनोखी श्रद्धांजली वाहिली जाते. तब्बल 30 वर्षांपासून गावात रंगाची उधळण होत नसल्याने आता तर, गावातील छोट्या मुलांनाही रंगपंचमी म्हणजे काय, याची कल्पनाही नाही.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….