मुंबई विमानतळावर कोट्यवधीचे सोने आणि परदेशी चलन जप्त…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई विमानतळावरून सीमाशुल्क विभागाने कोट्यवधी रुपयांचे सोने आणि विदेशी चलन जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8-9 फेब्रुवारी 2023 रोजी सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवायांमध्ये ही जप्ती करण्यात आली आहे.
सीमाशुल्क विभागाने एका व्यक्तीकडून सुमारे 2.8 किलो सोने जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 1.44 कोटी रुपये एवढी आहे . मुंबई विमानतळावर अजून एका कारवाईत सीमाशुल्क विभागाने एका प्रवाशाकडून सुमारे 90 हजार अरब अमिराती दिरहाम आणि दुसऱ्या प्रवाशाकडून 90 हजार अमेरिकन डॉलर्स जप्त केले. जप्त केलेल्या विदेशी चलनाची किंमत अंदाजे 92 लाख रुपये आहे.
अमेरिकन डॉलर्सची तस्करी करणाऱ्या आरोपी प्रवाशाने हे डॉलर्स एका पॅकेटमध्ये ठेवले आणि ते आपल्या बॅगेत अशा प्रकारे शिवून लपवले होते की नजरेत पकडणे फार कठीण होते, मात्र सीमा शुल्क विभागाने कमालीची हुशारी दाखवत आरोपीला पकडले. तसेच दिरहमची तस्करी करणाऱ्या व्यक्तीने एका बॉक्समध्ये दिरहम अशा प्रकारे लपवून ठेवला होता की, कस्टम विभागालाही एकदा फसवले होते, मात्र कसून चौकशी केल्यानंतर आरोपी पकडला गेला.
परदेशातून सोने आणि विदेशी चलन तस्करीची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. नुकतेच कोची विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने एका प्रवाशाकडून सुमारे दोन किलो सोने जप्त केले. सोने पॅक केल्यानंतर आरोपी लपवून घेऊन जात होते. जप्त केलेल्या सोन्याची किंमत अंदाजे 85 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे कस्टम विभागाला चकमा देण्यासाठी प्रत्येक वेळी आरोपी विचित्र पद्धतीचा अवलंब करतात.