राहुल कलाटे उमेदवारीवर ठाम, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीतून माघार घेण्यास नकार, तिरंगी लढतीने उडणार धुरळा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकासआघाडीतून बंडखोरी केलेले शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते राहुल कलाटे यांनी आपला बंडखोरीचा झेंडा खाली उतरवण्यास नकार दिला आहे. चिंचवडच्या जनतेच्या भावनांचा आदर करत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे राहुल कलाटे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन जिल्हा संपर्कप्रमुख नेते सचिन आहीर यांनी आज (10 फेब्रुवारी) राहुल कलाटे यांची भेट घेतली होती. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे कलाटे यांचे मन वळवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन स्वतः सचिन आहीर हे चिंचवडमध्ये आले होते. त्यांनी कलाटे यांच्याशी चर्चा केली, तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करवून दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आहीर यांनी कलाटे हे योग्य निर्णय घेतली असा आशावाद प्रगट केला होता.
मात्र त्यानंतर राहुल कलाटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे कलाटे यांनी सांगितले.
राहुल कलाटे यांची बंडखोरी कायम राहिल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकासआघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले नाना काटे यांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आणि भाजपाच्या उमेदवार आश्विनी जगताप यांच्यासमोर आता नाना काटे आणि राहुल कलाटे यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळेच या पोटनिवडणूकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.