अजित पवारांचं विधान चुकीचं, संदर्भ द्या ; संभाजीराजे छत्रपतींचा संताप…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीमहाराज यांच्याविषयी केलेल्या एका विधानामुळे वादंग निर्माण झाला आहे. भाजपा या विधानाचा निषेध करत आहे. अशातच आता छत्रपतींचे वारसदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली आहे.
संभाजीराजे आज माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, “मी संभाजीमहाराज यांना स्वराज्यवीर, धर्मवीर असं नेहमीच म्हटलंय. अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन विधान केलं, स्पष्ट करा. ऐतिहासिक संदर्भ, घटना बोलायची असेल तर अभ्यास न करता प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवार अर्धसत्य बोलले, त्यांचं विधान चुकीचं. स्वराज्यरक्षक बोलले तर बरोबर आहे. पण धर्मवीर नव्हते हे चुकीचं आहे.”
अजित पवार यांनी सभागृहात बोलताना अभ्यास करुनच बोलायला हवं, असा सल्लाही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. तसंच संभाजीमहाराज स्वराज्यरक्षकही होते आणि धर्मवीरही होते, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या वक्तव्याबद्दल त्यांनी अजित पवारांचा निषेधही केला आहे.