“.तर शिवसेना पुन्हा एकसंध व्हायला वेळ लागणार नाही,” उद्धव ठाकरेंना उद्देशून दीपक केसरकरांचे सूचक विधान….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष निर्माण होत आहे. नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही हा संघर्ष पाहायला मिळाला.
अधिवेशन सुरू असताना उपसभापतींच्या दालनासमोर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे म्हटले जात आहे. याच वृत्तावर बोलताना माध्यमांत जी चर्चा आहे, त्यावर मी आगामी एक किंवा दोन दिवसांत बोलेन, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना पुन्हा एकदा एकसंध होण्यास वेळ लागणार नाही, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
“एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे मन जिंकले. त्यामुळेच आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यावेळी काय काय घटना घडल्या हे बोलून दाखवणार आहे. मी ते मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवलेले आहे. सध्या नवे वर्ष आहे म्हणून मी बोलत नाहीये. एक दोन दिवस जाऊदेत. नंतर मी बोलतो. मी जेव्हा बोलेन तेव्हा महाराष्ट्रच नव्हे तर प्रत्येक शिवसैनिकाला सत्य समजेल,” अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
“ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी लढा लढवला, ते सहजासहजी सोडून जात नाहीत. निश्चितपणे काहीतरी घडलेलं आहे, ज्यामुळे आमदार बाहेर पडले. नेमकं काय घडलं होते, याचे उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना एकसंध होण्यास वेळ लागणार नाही,” असेही दीपक केसरकर म्हणाले.