जयंत पाटलांना शिंदे-फडणवीसांचा पुन्हा धक्का ; दिले थेट चौकशीचे आदेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारने धक्का दिला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश शिंदे-फडणवीस सरकारने दिले आहेत.
या आधी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना अपशब्द वापरल्याच्या कारणावरून जयंत पाटलांना निलंबीत करण्यात आले होते. तर आता जयंत पाटील यांची सत्ता असलेल्या सांगली जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश शिंदे-फडणवीस सरकारने दिले आहेत. त्यामुळे जयंत पाटलांना दुसऱ्यांदा धक्का देण्यात आला असून ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्हा बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारच्या काळात देण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्या चौकशीला स्थगिती देण्यात आली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने याच प्रकरणावरून चौकशी करण्याचे आदेश दिलेत. राज्यात मविआ सरकार असताना मानसिंग नाईक यांना बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्यामुळे त्यांनी चौकशीची मागणी केली होती.
मात्र, तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशीला स्थगिती दिली होती. त्यानंतर पार पडलेल्या निवडणुकीत पुन्हा जयंत पाटील यांची बँकेवर सत्ता आली. यावेळी मानसिंग नाईक यांना बँकेचे अध्यक्षपद देण्यात आले. मात्र आता याच बँकेत गैरव्यवहाराच्या आरोपांवर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.
दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जयंत पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.