अधिवेशनाआधीच बावनकुळे मनातलं बोलले…! शिंदे गटाची सावध प्रतिक्रिया, राष्ट्रवादीचा निशाणा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सोमवार 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होत आहे. या अधिवेशनाच्या एक दिवस आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.
महाराष्ट्राचं सर्वोच्च पद असलेलं मुख्यमंत्रीपद फडणवीसांना मिळालं पाहिजे, ही जबाबदारी आपल्यावर आहे, त्यामुळे तेली समाजाने मागे उभं राहावं. देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी ताकद आपण त्यांच्या पाठीशी उभी करू, असं बावनकुळे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटायला सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून बावनकुळेंच्या या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने यावरून भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
शिंदे गटाची प्रतिक्रिया ‘एखाद्या वक्तव्याला विनाकारण वळण देण्याचा प्रयत्न करू नका. मी परत परत सांगतोय, एका दिवसाने काही परिणाम होत नाही. कुणी कितीही प्रयत्न केला, तरी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप 2024 ची निवडणूक एकत्र लढवतील, हे शिंदे साहेबांनी सांगितलंय, त्यावर आम्ही ठाम आहोत,’ असं शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीचा निशाणा ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूर अधिवेशनाआधी बोलले. हे याआधी चंद्रकांत पाटीलही बोलले होते. याचा अर्थ सोपा आणि सरळ आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे जरी खरं असलं भाजपला ते पचनी पडलेलं नाही. एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम भाजपने केलेला आहे, पण अजूनही हे शिंदेंच्या लक्षात येत नसेल, तर त्याला आमचा नाईलाज नाही. बावनकुळेंच्या वक्तव्याला गांभिर्याने बघितलं पाहिजे. फडणवीस हेच मुख्यमंत्री असावेत, असं भाजपचं मत आहे,’ असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.