मविआच्या महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी, कारणही सांगितलं ; मात्र कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच चर्चा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. महापुरुषांबद्दल सुरू असलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाला भायखळ्यामधून सुरुवात होणार आहे. या मोर्चात अजित पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीमधील जवळपास सर्वच नेते सहभागी होणार आहेत. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे या महामोर्चात सहभागी होणार नाहीत. यावरून आता राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.
या निमित्ताने पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांची भाजपसोबत वाढत असलेल्या जवळीकीची चर्चा सुरू झाली आहे. अशोक चव्हाण यांचं ट्विट अशोक चव्हाण आज महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या महामोर्चाला उपस्थित राहणार नाहीत. त्यांनी यापूर्वीच ट्विट करत आपण महामोर्चात का सहभागी होत नाही याचं स्पष्टीकरण दिलं आहे. एका लग्न समारंभासाठी जायचं असल्यानं आपल्याला या मोर्चात सहभागी होता येणार नसल्याचं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.
मात्र सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगताना दिसत आहे.
काँग्रेसमध्ये चर्चेला उधाण अशोक चव्हाण महामोर्चाला दांडी मारणार असल्यानं याची काँग्रेस पक्षात जोरदार चर्चा रंगली आहे. अशोक चव्हाण यांची भाजपसोबत जवळीक वाढत आहे, त्यामुळेच चव्हाण हे महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होणार नसल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू झाली आहे. यापूर्वी देखील अशोक चव्हाण आणि भाजपच्या जवळकीच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. त्यातच आता अशोक चव्हाण या महामोर्चाला उपस्थित राहणार नसल्यानं तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.