राऊत, देशमुखांना दिलासा; मात्र नवाब मलिकांना न्यायालयाचा धक्का…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मलिकांनी वैद्यकीय कारण देत जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
ही सुनावणी आता 6 जानेवारीला होणार आहे. यामुळे आता नवाब मलिकांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी कथित गैरव्यवहार प्रकरणात जामीन फेटाळण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मलिकांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात आवाहन दिले होते. तसेच ही सुनावणी तातडीने घेण्याची मागणी देखील केली होती. त्यांच्या अपिलाची गंभीर दखल घेत न्या. मकरंद कर्णिक यांनी मंगळवारी तातडीची सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांपाठोपाठ नवाब मलिक यांनाही जामीन मिळणार का ? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते.
मात्र, मंगळवारी उच्च न्यायालयाने मलिकांच्या जामिन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. प्रकृतीचे कारण देत मलिकांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भ्रष्टाचार आणि वसुलीच्या आरोप करण्यात आल्यानंतर सीबीआयतर्फे तपास सुरु आहे. या प्रकरणामध्ये सोमवारी (दि.12) जामीन मंजूर झाला आहे.
मात्र, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं कोर्टात सांगितलं. त्यासाठी जामिनाच्या अर्जावर 10 दिवसांची स्थगिती मिळावी अशी मागणी देखील सीबीआयने केली. यावर उच्च न्यायालयाने सीबाआयचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर देशमुख यांच्या जामिनाच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे जामीन मिळाला असला तरीही अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम पुढील 10 दिवस वाढला आहे. देशमुखांपाठोपाठ मलिक देखील तुरुंगाबाहेर येणार का अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता मलिकांना तुरुंगाबाहेर येण्यासाठी 6 जानेवारीपर्यँत प्रतीक्षा करावी लागणार आहे.