एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात महत्वाचं अपडेट, राज्यात सहा केंद्रांवर या तारखेला होणार परीक्षा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या आठवड्यात एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करण्यात आला. ही परीक्षा 29 ऑगस्ट, 2022 रोजी घेण्यात आली होती. राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर 4 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 उत्तीर्ण उमेदवारांनी मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याचा कालावधी 14 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान दिला आहे. या कालावधीमध्ये उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुख्य परीक्षा ही अमरावती, नाशिक,पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या सहा केंद्रांवर 21, 22 आणि 23 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहे.
पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी आणि गुणांची कटऑफ आयोगाच्या https://mpsc.gov.inया संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे 4 तारखेला निकाल जाहीर झाला आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या व परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल, असं एमपीएससीनं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं होतं.
मुख्य परीक्षा 21, 22 आणि 23 जानेवारी 2023 रोजी
आयोगानं दिलेल्या पत्रकानुसार आता पूर्व परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा 21, 22 आणि 23 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेतील पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळवण्यात आलं आहे. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती आणि परीक्षा शुल्क दिलेल्या मुदतीत विहित पध्दतीनं सादर करणं आवश्यक आहे. अन्यथा त्या उमेदवाराला मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असं आयोगाच्या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे.