जेलमधून बाहेर येताच संजय राऊत थेट हॉस्पिटलमध्ये, भावाने दिली तब्येतीची माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना नेते संजय राऊत यांची 100 दिवसानंतर आर्थर रोड जेलमधून सुटका झाली आहे. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला.
पीएमएलए कोर्टाच्या या निर्णयाविरोधात ईडीने हायकोर्टात धाव घेतली, पण हायकोर्टानेही संजय राऊत यांचा जामीन कायम ठेवला. संजय राऊत यांच्या जामिनावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर संध्याकाळी 6.45 च्या सुमारास संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर आले. जेलमधून बाहेर येताच राऊत हॉस्पिटलमध्ये चालले आहेत, त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते तपासणीसाठी जात असल्याचं संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी सांगितलं आहे.
जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत पहिले सिद्धीविनायक मंदिरात जातील आणि मग शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील, असं सांगण्यात येत होतं, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे पहिले हॉस्पिटलमध्ये जात आहेत.
आर्थर रोड जेलमधून सुटका झाल्यानंतर आता संजय राऊत उद्धव ठाकरे यांची भेट कधी घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. संजय राऊत यांना जामीन मिळताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण राऊत कोठडीमध्ये असल्यामुळे दोघांमध्ये बोलणं होऊ शकलं नाही. संजय सावंत या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या फोनवर उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. संजयचं अभिनंदन कर, लवकरच त्याला भेटणार आहे, असा निरोप उद्धव ठाकरेंनी दिला. संजय राऊत यांनाही उद्धव ठाकरेंचा निरोप मिळाल्यानंतर धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली.
शिवसैनिकांमध्ये जल्लोष
संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसैनिकांमध्य आनंदाचं वातावरण आहे. आर्थर रोड जेल आणि शिवसेना भवनबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे, तसंच संजय राऊत यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आले आहेत.