शरद पवार थेट नांदेडच्या सभेतच सहभागी होणार…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या सायंकाळी सात वाजता तेलंगाणातून महाराष्ट्रात दाखल होत आहे. देगलूरमध्ये ही यात्रा दाखल होऊन पाच दिवस आणि चार मुक्काम असा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये असणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे नायगांव येथे ९ नोव्हेंबर रोजी या यात्रेत सहभागी होणार होते. परंतु आता ते १० रोजी नांदेड येथे आयोजित राहूल गांधी यांच्या सभेतच हजेरी लावणार असल्याची माहिती काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी नांदेडमध्ये करण्यात आली असून सर्वसामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा यात्रेला मिळत असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. (Ashok Chavan) अशोक चव्हाण म्हणाले, राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा देगलूरमध्ये नियोजित वेळेपेक्षा साडेतीन तास उशीराने दाखल होत आहे. (Sharad Pawar) साधरणता सायंकाळी साडेसात वाजता या यात्रेचे आगमन देगलूरमध्ये होणार आहे.
तेथून रात्रीच ९ किलोमीटरची पदयात्रा वन्नाळीपर्यंत काढण्यात येणार आहे. तिथे गुरुनानकांचे दर्शन घेऊन सकाळी पुन्हा कारने ही यात्रा देगलूर येथे येणार असून पुन्हा तिथून ठरल्याप्रमाणे पदयात्रा सुरू होईल. भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद सर्वसामान्य नागरिकांकडून मिळत असून विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संस्था, संघटनांचा देखील सहभाग असणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व इतर डाव्या पक्षांचे नेते देखील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे नांदेडला मुक्कामी येवून ९ तारखेला नायगांव येथील पदयात्रेत सहभागी होणार होते.
परंतु यात आता बदल करण्यात आला असून ते १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नांदेड येथील राहूल गांधीच्या जाहीर सभेतच सहभागी होण्याची शक्यता आहे. तशा सूचना आम्हाला मिळाल्या आहेत, परंतु त्यांच्या प्रकृतीनूसार यात बदल होऊ शकतो, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.