मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करताच ‘आप’ ला झटका…! बड्या नेत्याने सोडली साथ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदाबाद :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमधील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. यादरम्यान नुकतेच गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला आहे.
त्यानंतरच लगेच पक्षाला मोठा झटका बसला आहे. आपचे ज्येष्ठ नेते इंद्रनील राजगुरू यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलत आम आदमी पार्टी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आम आदमी पक्षात येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्येच होते. ते ‘आप’मध्ये राष्ट्रीय सहसचिव होते. त्यांचे पक्षात स्वागत करताना काँग्रेसचे गुजरात प्रभारी रघु शर्मा म्हणाले, इंद्रनील राजगुरू एका विचारसरणीचे होते आणि आज ते पुन्हा त्याच विचारधारेने काम करण्यासाठी काँग्रेस परिवारात सामील होत आहेत.
राजगुरू म्हणाले, मला नेहमीच वाटत होते की भाजप हा देशासाठी वाईट पक्ष आहे आणि गुजरातमध्ये त्याचा पराभव करणे आवश्यक आहे. म्हणूनच भाजपचा पराभव करण्यासाठी मी ‘आप’मध्ये गेलो. पण मला असे आढळले की जसा भाजप लोकांना मूर्ख बनवतो तसाच AAP देखील लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो.
दुसरीकडे, राजगुरु यांनी पक्ष सोडल्यानंतर लगेचच आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. राजगुरू हे पक्षात तिकिटासाठी सौदेबाजी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे .15 विधानसभा जागांसाठी आपल्या आवडीचे उमेदवार हवे असण्याबरोबरच मुख्यमंत्रीपदासाठी आपला चेहरा घोषित करण्याची मागणी ते करत होते. पण आम आदमी पार्टी हा जनतेचा पक्ष आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे असेही ते म्हणाले.
आम आदमी पार्टीने (AAP) शुक्रवारी गुजरातमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून इसुदान गढवी यांची घोषणा केली आहे. गुजरातमधील 182 विधानसभा जागांपैकी पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 1 डिसेंबरला आणि उर्वरित 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.