पालकमंत्र्यांची ‘घटस्थापना’ झाली, आता नाराजीचा गरबा…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील ‘ईडी’ सरकारने अखेर मुहूर्त काढून पालकमंत्र्यांची ‘घटस्थापना’ केली असली तरी त्यावरून आता नाराजीचा गरबा सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अख्खा विदर्भ आपल्या ताब्यात तर ठेवलाच आहे, पण शिंदे गटाला फक्त 15 जिल्हे देऊन वाटाण्याच्या अक्षता वाटल्या आहेत.
त्यामुळे शिंदे गट नाराज आहेच, पण दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.
‘ईडी’ सरकारचा धुसफूस, खदखद, नाराजी हा स्थायीभावच बनला आहे. सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार, त्यानंतर खातेवाटप आणि आता पालकमंत्री पद अशी चढत्या क्रमाने नाराजीची कारणे बाहेर येऊ लागली आहेत. पालकमंत्री नसल्याने जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकाच थांबल्या होत्या. त्यामुळे नवी विकासकामे मंजूर होत नव्हती. तशात महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देऊन ‘ईडी’ सरकारने राज्याचा विकास आणखीनच ठप्प केला होता.
विरोधकांसह जनतेतूनही याविरोधात टीका होऊ लागताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शनिवारी अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. जिल्हा नियोजनाच्या जूनपासून बैठका झालेल्या नाहीत. आता पालकमंत्री मिळाले, बैठका होतील असे म्हटले तरी निधी खर्च करणार कधी, हा प्रश्न शिल्लक राहतोच आहे.
एकीकडे ही प्रशासकीय अडचण असताना दुसरीकडे सरकारमधील अंतर्गत नाराजीही प्रकर्षाने समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसह तब्बल सहा जिल्हय़ांचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवून अख्खा विदर्भच ताब्यात घेतला आहे.
केसरकरांना मुंबईत का आणले?
सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे दीपक केसरकरांशी पटत नाही. त्यामुळेच राणे यांच्या हट्टापायी केसरकरांना सिंधुदुर्ग न देता त्यांच्याकडे मुंबई शहर आणि कोल्हापूर या जिल्हय़ांची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण यांना ठाणे हवे होते, पण पदरात पडला सिंधुदुर्ग. आता चव्हाण यांना राणेंच्या दबावाखाली, हुकूमानुसार काम करावे लागणार त्याचे टेन्शन आहे.
सत्तार, सावे नाराज
संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी अब्दुल सत्तार, भाजपचे अतुल सावे आणि संदीपान भुमरे यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र भुमरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्याने सत्तार, सावे यांची धुसफूस सुरू झाली आहे. नारजी शिंदे गटातच आहे असे नाही तर कानामागून येऊन तिखट झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटलांबद्दलही चंद्रकांत पाटील नाराज आहेत. फडणवीस यांनी चंद्रकांतदादांची पुणे जिल्हय़ावर बोळवण करून विखे-पाटलांना मात्र नगर आणि सोलापूर या दोन जिल्हय़ांचा ताबा दिला आहे. एकूणच काय तर ऐन नवरात्रोत्सवात ईडी सरकारमधील नाराजीचा गरबा चांगलाच जोर धरणार याचे संकेत मिळत आहेत. खदखद, धुसफूस आणि नाराजीचा हा तिसरा अंक सुरू झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
सहा जिल्हे त्यांना कसे पेलवणार?
”शिंदे-फडणवीस सरकारने शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा केली. काही जिह्यांमध्ये एकच पालकमंत्री दिला आहे, तर काही पालकमंत्र्यांकडे दोन जिल्हे दिले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्हे देण्यात आले आहेत. माझ्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद होते तर माझ्या नाकीनऊ येत होते. आठवडय़ातून किमान एक दिवस मला जिह्यासाठी द्यावाच लागत होता. त्यामुळे ज्यांच्याकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत ते त्यांना कसे पेलवणार आहे हे मला माहीत नाही, परंतु त्यांना माझ्या शुभेच्छा,” असा टोलाही अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात?
”येत्या काळात कधी जर त्यांचं राज्य आलंच आणि त्यांनाही जर दोन-चार जिल्हे पाहायचे असतील तर ते कसे सांभाळायचे याचा मी त्यांना निश्चित गुरुमंत्र देईन. मात्र हे सगळे जिल्हे नियोजन मंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात,” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…