राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षांचे निकाल लवकर घोषित करण्यासाठी विद्यापिठाच्या कुलगुरूंशी चर्चा करू ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई –
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षांचे निकाल लवकर घोषित करण्यासाठी विद्यापिठाच्या कुलगुरूंशी नागपूर येथे २८ ऑगस्ट या दिवशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २५ ऑगस्ट या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तरात दिली. सदस्य प्रवीण दटके यांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता.
सदस्य प्रवीण दटके म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षांचे काम ‘एम्.के.सी.एल्.’ आस्थापनाला देण्यात आले होते; मात्र प्रथम वर्षातील १५० हिवाळी ‘ऑनलाईन’ परीक्षांचे निकाल अडीच मासांत होऊनही प्रलंबित आहे. यावर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनामुळे या परीक्षा विलंबाने चालू झाल्या असून एकसमान पद्धती बनवण्याच्या प्रक्रियेमुळे संबंधित सॉफ्टवेअरमध्ये बरेच पालट केल्यामुळे १५० परीक्षांपैकी केवळ ९ परीक्षांचे निकाल घोषित करण्याची प्रक्रिया चालू आहे. उर्वरित सर्व परीक्षांचे निकाल वेळेत घोषित करण्यात आले आहेत.