५ ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार…? ; सूत्रांची माहिती….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.
अशात मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी (ता. ५) होणार असल्याची माहिती साम टीव्हीने दिली आहे. यावेळी १५ ते १६ आमदार शपथ घेणार असल्याचे, सूत्रांकडून समजते.
शिंदे गट व भाजपचे सरकार ३० जून रोजी स्थापन झाले. याच दिवशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या गोष्टीला आज सव्वा महिना झाला आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच विस्तार होणार असे म्हणत आले आहेत.
मात्र, अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळेच विरोधकही सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आले आहे. तुम्ही बरोबर आहात तर मंत्रिमंडळाचा विस्तार का करीत नाही, असे प्रश्न विचारत आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाचा विस्तार ५ ऑगस्टला होणार असल्याची माहिती आहे. यावेळी १५ ते १६ मंत्री शपथ घेतील, अशी शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर बुधवारी (ता. ३) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सकाळी सुरू झालेली सुनावणी दुपारपर्यंत चालली. दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गुरुवारी (ता. ४) पुन्हा सुनावणी होणार आहे.
आजवर अनेक तारखा
बंडखोर आमदारांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही, असे बोलले जात आहे. निर्णयानंतर विस्तार होईल, अशी चर्चा असताना अनेक तारखा मीडियात आल्या. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही. आता पुन्हा नवीन तारीख मिळाली आहे. ही खरी ठरते की नाही हेच पाहणे बाकी आहे.