भाजपाचं जोरदार शक्ती प्रदर्शन ; हैदराबाद मध्ये मोदीं-शाहांसह १९ राज्यांचे मुख्यमंत्री करणार मोर्चेबांधणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- तेलंगाणातील हैदराबादमध्ये आजपासून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह १९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण हैदराबादमध्ये पक्षाच्या मेगा शोच्या आधी भाजपचे झेंडे आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. पोस्टर्समध्ये केंद्र सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत मोदींची स्तुती करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक कोपरा भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या मोठमोठ्या कटआउट्स आणि बॅनरने सजलेला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठका त्यानंतर 2 जुलै रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. 3 जुलै रोजी परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासह जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, पक्षाचा विस्तार हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असेल. पक्षाच्या अधिक कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची गरज असलेल्या पर्यायांवरही ते चर्चा करतील. 18 वर्षांनंतर, हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी शहर सजलं आहे. राष्ट्रीय नेते, मुख्यमंत्री आणि इतर नेते मतदारसंघांना भेट देत असल्याची माहिती तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष एन व्ही सुभाष यांनी सांगितलं.