राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी भाजपाही लागली कामाला..….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली, 15 जून :- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
दुसरीकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West bengal CM Mamata Banerjee) यांनी देशातील विरोधकांची बैठक (Opposition Party meet) आयोजित केली होती. या बैठकीला 17 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीनंतर आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली.
आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केली. राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांची बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यासोबत चर्चा केली. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आगामी राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच आज राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत मल्लिकार्जुन यांनी भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या नावावर चर्चा करु, असं राजनाथ यांना सांगितलं आहे. राजनाथ सिंह यांनी ममता आणि मल्लिकार्जुन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबतही फोनवर बातचित केली.
राजनाथ सिंह यांनी बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तसेच एनडीएचे सहयोगी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत ईडीकडून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबाबत सुरु असलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला. केंद्रीय एजन्सी विरोधी पक्षांना लक्ष्य बनवत आहेत, अशी घणाघाती टीका ममता बॅनर्जी यांनी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत गोपालकृष्ण गांधी, डॉक्टर फारुख अब्दुल्ला आणि शरद पवार यांच्या नावावरती प्राथमिक चर्चा झाली.
याबाबतच्या सहमतीसाठी मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि ममता बॅनर्जी सर्व पक्षांशी चर्चा करणार. पण याबाबत कोणत्याही नावावर आज चर्चा झाली नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. मात्र सर्वप्रथम शरद पवार यांचे नाव पुन्हा एकदा उमेदवारीसाठी पुढे करण्यात आले. ते तयार नसतील तर अन्य नावांचा विचार करावा, अशी ममतांची सूचना होती.
आजच्या बैठकीमध्ये केवळ प्राथमिक चर्चा झाली. देशाच्या राज्यघटनेचे पालन करणारा आणि मोदी सरकारला लोकशाहीचे नुकसान करण्यापासून रोखणारा राष्ट्रपती निवडला जावा, असे या बैठकीच्या ठरावात नमूद करण्यात आले. सतरा पक्षांचे प्रतिनिधी नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते. यात सर्वसंमतीने हा ठराव मंजूर करण्यात आला.