संभाजीराजेंची शुगर , ब्लड प्रेशर कमी झाला ; औषध घेण्यास स्पष्ट नकार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे.
त्यांचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे, मात्र त्यांनी औषधं घ्यायला नकार दिला आहे. संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की, 60 तास झालेत त्यांना आमरण उपोषण करत आहेत. त्यांचं शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी यासंदर्भात नकार दिला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.
रक्तदाब आणि शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सोबतच संभाजीराजेंना कालपासून तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे. कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यास संभाजीराजेंकडून नकार देण्यात आला आहे. डाॅक्टरांकडून कालच सलाइन लावण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र संभाजीराजेंकडून सलाइन लावून घेण्यास नकार देण्यात आला आहे.
संभाजीराजे यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण
असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. आंदोलन कुठवर न्यायचं हे सरकारनं ठरवावं, असंही खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, आज सकाळी अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. आमरण उपोषण करायची माझी इच्छा नाही. महाराजांनी ज्याप्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्याप्रकारे मी सुद्धा प्रयत्न करतोय, असं ते म्हणाले.
22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात
खासदार संभाजीराजे म्हणाले की, गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय. महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे. त्यामुळे ज्या 22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले. याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे. मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय. सरकारकडून बोलवणं आलंय, असं ते म्हणाले.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली 11 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. संभाजीराजे म्हणाले की, यातून मार्ग निघाला पाहिजे. गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून आपण इथे आहोत. मी मराठ्यांचा सेवक, पण बहुजनांचं नेतृत्व करतो. आपण मार्ग काढून यावं अशी माझी विनंती आहे, असं ते म्हणाले.