सुप्रिया सुळेंनी खाली बसून वाडिलांना घातले बूट ; लतादिदिंच्या अंत्यदर्शनावेळचा “तो” फोटो व्हायरल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या निधनाचं वृत्त येताच संपूर्ण देशात शोककळा पसरली.
लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती.
उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. अंत्यदर्शनावेळचा त्यांचा एक फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण बाप आणि लेकीच्या नात्याचं कौतुक करत आहेत. बाप आणि लेकीचा हा जिव्हाळा अनेकांना भावूकही करत आहे.
झालं असं की पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार होते. वडिलांना खाली वाकून बूट घालण्यास त्रास होईल म्हणून सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या आणि त्यांनी खाली बसून वडिलांच्या पायात बूट घातले.
लता मंगेशकर यांचं निधन –
करोनाचा संसर्ग झाल्याने लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सौम्य लक्षणे होती. परंतु हळूहळू त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. गेल्या आठवडय़ात त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा झाली होती. मात्र या आठवडय़ात पुन्हा त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आणि अवयव निकामी झाल्यामुळे रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले.
करोना संसर्गातून त्या बऱ्या झाल्या होत्या. परंतु करोनापश्चात त्यांच्या आजारात अधिक गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांचे निधन झाले, असे ब्रीच कॅन्डी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन संथनम यांनी सांगितले.
ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून दुपारी त्यांचे पार्थिक पेडर रोड येथील प्रभुकुंज निवासस्थानी आणण्यात आले. चित्रपटसृष्टीतील तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी प्रभुकंज येथे लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतले. पेडर रोड येथून दुपारी ४ च्या सुमारास लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात पोहोचली. त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात पोहोचल्यानंतर लता मंगेशकर यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी शिवाजी पार्क मैदानात लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन केले. लष्कर, नौदल आणि हवाई दलातर्फे लता मंगेशकर यांना शिवाजी पार्क मैदानात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
‘मेरी आवाज ही पहचान हैं’, ‘अखेरचा हा तुला दंडवत’, ‘ए मेरे वतन के लोगो’ अशी गाणी गात रसिकांनी शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. ‘लता दीदी अमर रहे’ अशा घोषणांनी शिवाजी पार्क दुमदुमून गेले.