अटक सत्र थांबवा अन्यथा मोर्चा काढू :- नारायण राणेंचा इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गात सुडाचे राजकारण व दडपशाही सुरू केली आहे. कोणतीही खातरजमा न करता पोलिसांनी सुरू केलेले अटकसत्र तत्काळ थांबवावे. पोलिसांनी सरकारचे ऐकून सत्तेचा दुरुपयोग करू नये.
भाजप कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकण्याचे न थांबल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल(ता.२६) पत्रकार परिषदेत दिला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज जिल्हा बँक निवडणूक आणि नगरपंचायतच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांनी जी दडपशाही, हुकूमशाही चालविली आहे, त्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दडपशाही चालविली आहे. सुडाचे राजकारण सुरू केले आहे. या दडपशाहीला खतपाणी घालण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर अटकसत्र मोहीम हाती घेतली आहे. मोठ्या प्रमाणात कोणतीही खातरजमा न करता अटकसत्र सुरू केले आहे. हे अटकसत्र त्यांनी तात्काळ थांबवावे. अन्यथा एसपी कार्यालयावर आम्हाला भव्य मोर्चा काढावा लागेल. जिल्हा बँक निवडणूक व चारही नगरपंचायतीवर भाजपा शंभर टक्के यश मिळविणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. त्यामुळे येथील मतदार शेतकरी जिल्हा बँकसह चारही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात देणार आहे. सत्ताधाऱ्यांची दडपशाही आम्ही निश्चितच मोडीत काढू. राज्यातील महाविकास आघाडी सर्व बाबतीत निष्क्रिय ठरली आहे. कोणतेही प्रश्न सोडवू शकलेली नाही. मुख्यमंत्री असून नसल्यासारखे आहे. कणकवलीमध्ये एका सज्जन कार्यकर्त्याला मारहाण झाली, या घटनेबाबत आमदार नितेश राणे, संदेश सावंत यांना पोलीस वारंवार बोलावून त्यांना अटकेसाठी सत्ताधारी पोलिसांच्या माध्यमातून सुडाचे राजकारण करत आहेत.” यावेळी माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप नेते रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, राकेश कांदे आदी उपस्थित होते.