थर्टी फर्स्ट घरातच….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- थर्टी फर्स्ट घरातच पार्ट्यांवर बंदी घातली आहे. शुक्रवारी मध्यरात्री (ता.२४) प्रशासनाने याबाबत निर्देश जारी केले. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर साथ रोग नियंत्रण कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई केली जाणार आहे. तसेच, पार्टीचे ठिकाणही सील करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पार्टीसाठी उत्साही असणाऱ्यांना घरात बसूनच पार्टी करावी लागणार आहे.
ओमिक्राॅनचे संकट तसेच नववर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारने शुक्रवारी संपूर्ण राज्यात कठोर नियमावली लागू केली. त्यात स्थानिक प्रशासनाला गरजेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी घातली आहे. निर्देशानुसार सभागृह तसेच खुल्या जागेत होणाऱ्या सर्व प्रकारच्या पार्ट्यांवर बंद घालण्यात आली आहे.
पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके तयार केली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जे प्रभाग मोठे आहेत त्या प्रभागात भरारी पथकांची संख्या पाचपर्यंत वाढविण्यात येणार आहे. भरारी पथकांमार्फत हॉटेल्स, पब, रेस्टॉरंटवर तसेच इतर ठिकाणीही नजर ठेवण्यात येणार आहे. नियम मोडल्यास साथ रोग नियंत्रण कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच इतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. यात फौजदारी कारवाई, दंड तसेच संबंधित ठिकाणही सील केले जाऊ शकते. —– गल्ली, गच्च्यांवरील पार्ट्यांवरही नजर नववर्षाच्या स्वागताला गल्लीबोळात, इमारतींच्या गच्च्यांवरही पार्ट्या होतात. अशा पार्ट्यांवरही लक्ष ठेवण्याची जबाबदारी भरारी पथकांवर सोपवण्यात आली आहे.