राज्याच्या चिंतेत भर ; दिवसभरात ओमिक्रॉनचे २३ नवे रुग्ण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरुच असताना ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron variant) आज २३ रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे.
तसेच कोरोनाच्या नवे १,१७९ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली.
राज्यात दिवसभरात १,१७९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ६१५ रुग्ण बरे झाले आहेत, तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यात २३ नवे ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळं या रुग्णबाधितांची संख्या ८८ वर पोहोचली आहे.
राज्याचा रिकव्हरी रेट ९७.७ टक्क्यांवर पोहोचला असून मृत्यूचं प्रमाण २.१२ टक्के इतक आहे. आजवर ६,८१,१७,३१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५३,३४५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, म्हणजेच हे प्रमाण ९.७७ टक्के आहे. दरम्यान, सध्या ७६,३७३ रुग्ण होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ८९९ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
ओमिक्रॉनबाधित रुग्णांची सविस्तर माहिती
राज्यात आज आढळलेल्या २३ ओमिक्रॉनबाधितांपैकी २२ नमुने एनआयव्हीत तर १ नमुना एनसीएलमधील तपासणीत आढळून आला आहे. या २३ पैकी १३ रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात ३ तर ग्रामीण भागात ३ रुग्ण आढळून आले आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये ७ रुग्ण आढळून आले. तसेच मुंबईत ५, उस्मानाबादेत २, ठाणे-नागपूर-मीरा भाईंदर येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण ८८ ओमिक्रॉनचे रुग्ण झाले आहेत.