वसतिगृहापासून वंचित धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना 43 हजार अनुदान ; पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ ; भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्यासाठी थेट रकमेचा लाभ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 21 डिसेंबर :- वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना सुरु करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना बारावी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रियभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 43 हजार एवढ्या रक्कमेपर्यंत वितरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या योजनेअंतर्गत शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश घेणे किंवा थेट अनुज्ञेय रक्कमेचा लाभ घेणे हे दोन पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता बारावी नंतरचे शिक्षण घेत असावा व बारावीमध्ये किमान 60 टक्के गुण मिळाले असावे.
केंद्र शासनाच्या पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्ती करीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापी दोन वर्षाच्या कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. अखील भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकिय परिषद, भारतीय फॉर्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्यशासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयात/संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला असावा.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.