राज्य अल्पसंख्याक आयोगाचे लवकरच पुनर्गठन! उमरखेडला संधी मिळण्याची शक्यता!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड
राज्यात महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण झाले असतांनाच अल्पसंख्याकांच्या उत्थानासाठी कार्यरत अल्पसंख्याक आयोगाचे पुनर्गठन करण्याचे संकेत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकतेच दिले आहेत या अनुषंगाने या आयोगावर सदस्यांची नियूक्ती करतांना त्यात उमरखेड शहरातील सक्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात असून त्या दृष्टीकोणातून शहरातील अल्पसंख्याक समाजातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यानी पक्षश्रेष्ठीकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे .
संविधानीक दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे मागील फडणविस सरकारचे पुर्णतः दुर्लक्ष झाले होते.राज्यात दोन वर्षापूर्वी शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तरिही हे सरकार राजकिय स्थर्याअभावी विविध महामंडळांचे पुनर्गठन करू शकले नाही आता मात्र आगामी विविध निवडणूका डोळयासमोर ठेवुन एक- एक महामंडळाचे पुनर्गठन करण्याचे काम राज्यशासनाने सुरू केले आहे . त्यातच अल्पसंख्याक आयोगाचा समावेश आहे .आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणूकामध्ये उमरखेडचा समावेश राहणार आहे . ही नगरपालिका पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसने गेल्या ६महीन्यापासून तयारी सुरु केली असून मागील निवडणुकीतील पराभवाचा धडा घेत यावेळी काँग्रेसने अल्पसंख्याक समाजावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे . उमरखेड शहराच्या राजकिय नेतृत्वाच्या उत्थानाचा आढावा घेतल्यास शहरातील कोणत्याही अल्पसंख्याक नेत्याला किंवा कार्यकर्त्यांला कोणत्याही राजकीय पक्षाने विशेषतः काँग्रेसने वाव दिला नाही हि खंत आजही या अल्पसंख्याक समाजामध्ये आहे. नेमकी हिच बाब हेरुन काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नुकतीच राज्य पातळीवर येथील अल्पसंख्याक समाजातील सक्रिय कार्यकर्ता तपासण्याची चाचपणी केली असल्याची विश्वसनिय माहीती आहे . त्या अनुषंगाने शहरातील वर्षानुवर्ष पक्षामध्ये कार्यरत राहून कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षोन्नतीसाठी कार्यरत अल्पसंख्यांक समाजातील जुन्या -नव्या कार्यकर्त्यांसह उदयोन्मुख नेतृत्वगुण जोपासणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.