कोविड-19 विषाणू फैलावास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 30 नोव्हेंबर :- राज्य शासनाच्या सूचनेनुसार यवतमाळ जिल्ह्याच्या सिमाक्षेत्रात सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजनविषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड-19 सार्वत्रिक साथरोग येण्यापुर्वी विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळानुसार सुधारित मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहून खुले करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहेत.
सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन आवश्यक आहे. सेवा प्रदाते, परिवास्तूंचे मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यांदींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे ग्राहक अतिथी इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे. कोवीड अनुरुप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती, संस्था दंडास पात्र असेल.
लसीकरणाची आवश्यकता :- तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती, अभ्यागत, पाहुणे ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण केलेले असावे. जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन, मेळावे, इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींव्दारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org) किंवा (telegram-MahaGovUniversalPass Bot ) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्रण असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती, लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यात प्रवास : कोणत्याही आंतराष्ट्रीय गंतव्यस्थानावरुन राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, या बाबतीत भारत सरकारच्या निदेशांव्दारे विनियमन करण्यात येईल. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे, एकतर संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र ते बाळगतील.
कोणताही कार्यक्रम, समारंभ,इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंध : चित्रपट गृह, नाटयगृह, मंगल कार्यालय, सभागृह, इत्यादी बंदिस्त जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या/समारंभाच्या उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संपूर्ण खुल्या असलेल्या जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभांसाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे), संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास, अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल. जर वरील नियमानुसार कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या एक हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल. आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे वर नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील. कोविड-19 च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, तेथे कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उक्त प्रतिनिधीला, कार्यक्रम पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा प्राधिकार असेल.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे इतर वाजवी निर्बंध : कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास, जर योग्य वाटल्यास, कोणत्याही क्षणी, त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी, यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढवीता येतील, परंतु कमी करता येऊ शकणार नाहीत. मात्र जाहीर नोटीसीव्दारे 48 तासांची पूर्व सूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही. या आदेशाच्या दिनांकास, अंमलात असलेले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लादलेले निर्बंध, जर ते पुढे चालु ठेवण्यासाठी जाहीर नोटीस देऊन पुन्हा जारी केले नसतील तर, ते 48 तासानंतर अंमलात असल्याचे बंद होतील.
संपूर्ण लसीकरणाची व्याख्या : संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ, लसीच्या दोन्हीही मात्रा(डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे, किंवा ज्या व्यक्तीचे वैद्यकीय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्याची मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती असा आहे, किंवा 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असा आहे.
कोविड अनुरुप वर्तनविषयक नियम व दंड :- कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनंदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरुप वर्तन या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. ज्यांचे कोविड अनुरुप वर्तन म्हणून वर्णन केले जाते अशा वर्तनाच्या पैलूंमध्ये, खाली नमूद केलेल्या वर्तनांचा समावेश होतो आणि कोविड १९ विषाणुचा प्रसार होण्यास जो अडथळा निर्माण करु शकतील अशा सर्व तर्कसंगत पैलूंचा देखील समावेश होतो, त्यात नमूद केलेली त्याच्या प्रसाराची कार्यपध्दती दिलेली आहे.
मूलभूत कोविड अनुरुप वर्तनाचे काही पैलू पुढीलप्रमाणे असून त्यांचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे. सर्व संस्थांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती, त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये आणि /किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा संबंधित संस्थेशी संबंधित असलेली अन्य कार्य करताना, त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था उत्तरदायी असतील. संस्था, त्यांच्या नियंत्रणाखाली किंवा जेथे ती संस्था आपला व्यवहार किंवा इतर कार्य करत असेल अशा सर्व ठिकाणी, अशा सर्व कर्मचाऱ्यांनी कोवीड अनुरुप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेले हॅण्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.
नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रुमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल. जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी 6 फुट सामाजिक अंतर राखा. साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करणे अनिवार्य आहे. साबणाने हात न धुता नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळावे. योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा. पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करा. खोकतांना आणि शिंकतांना, टिशु पेपरचा वापर करुन तोंड व नाक झाका आणि वापरलेल टिश्यू पेपर नष्ठ करा. जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वत:चा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपरा नाका तोंडावर ठेवून खोकावे व शिंकावे. सावर्जनिक ठिकाणी धुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर राखा. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता नमस्कार अभिवादन करा.
शास्ती : या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे पालन न करणा-या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये 500 इतका दंड करण्यात येईल. ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यांदीवर कोवीड अनुरुप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत), जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुध्दा रुपये 10 हजार इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक इत्यांदीमध्ये कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
जर एखादया संस्थेने किंवा आस्थापनेने, स्वत:च कोविड अनुरुप वर्तनाचे किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपध्दतीचे पालन करण्यात कसूर केली तर, ती, प्रत्येक प्रसंगी, रुपये 50 हजार इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोविड अनुरुप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविडअनुरुप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रुपये 500 इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रुपये 500 इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये 10 हजार इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास आपत्ती म्हणून कोवीड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.
कोवड अनुरुप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास, वर नमुद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे, उल्लंघन करणा-यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरुप वर्तनाचे नियम, धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरुप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय, मुद्दे, राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार असतील.
सदर आदेशात नमुद संपुर्ण निर्देशांचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्यक कायदेशिर व दंडात्मक कारवाई करण्यास नगरपरिषद, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत यांनी पोलीस विभागासह त्यांचे कार्यक्षेत्रात संयुक्त पथके गठीत करावीत.
आदेशातील बाबींचा भंग झाल्याचे निदर्शनास येत असल्यास त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करावयाचा झाल्यास ज्या पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये असा गुन्हा घडला आहे त्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अश्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी ह्या आदेशान्वये प्राधिकृत करण्यात आले आहे.
सदर आदेश दिनांक 29 नोव्हेंबर, 2021 पासून पुढील आदेशापावेतो यवतमाळ शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, भारतीय दंड संहिता व इतर संबंधित कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..