मोठ्या प्रमाणात कर्जाचे अर्ज स्विकृत करून कर्ज-मेळावा यशस्वी करा ; बँकर्स आढावा सभेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना ; ७ व १४ ऑक्टोबरला भव्य कर्ज मेळावा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 29 सप्टेंबर :- जिल्ह्यात दिनांक 7 ऑक्टोबर व 14 ऑक्टोबरला सर्व बँकामार्फत मेगा कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून याप्रसंगी सर्व बँकर व शासकीय यंत्रणेने आपसी समन्वयाद्वारे शेती, उद्योग व व्यावसायासाठी तसेच शासनाच्या विविध योजनेअंतर्गत कर्ज मिळण्याबाबत जास्तीत जास्त अर्ज प्राप्त करण्यासाठी आतापासून नियोजन करावे व मोठ्या प्रमाणात अर्ज स्विकृत करून कर्ज मेळावा यशस्वी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकर्स आढावा सभेत दिल्या.
कर्ज मेळाव्या संबंधी सर्व बँकर्स व शासकीय योजना राबविणारे अधिकारी यांची आढावा सभा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसूल भवन येथे काल घेतली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभीये, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक दीपक पेंदाम, सहाय्यक निबंधक राजेश गुर्जर इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
किसान क्रेडीट कार्ड, स्टँडअप इंडिया, पंतप्रधान स्वानिधी योजना, मुद्रा योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग योजना, आपत्कालीन पत हमी योजना, कृषी पायाभूत सुविधा योजना, अन्न प्रक्रीया उद्योग, मत्स व्यवसाय व विविध महामंडळा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्टापेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य होईल यादृष्टीने नियोजन करण्याबाबत तसेच यापुर्वी प्राप्त अर्जातील त्रुटींचे निराकरण करून त्यांना व विविध योजनेतून वंचित राहीलेल्या नागरिकांना प्राधाण्याने कर्ज मंजूर करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सर्व शासकीय योजनेअंतर्गत ज्या शाखेत कर्ज प्रस्ताव प्रलंबित आहे, त्याचा निपटारा करून जास्तीत जास्त कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिल्या.
बैठकीला संबंधीत शासकीय यंत्रणेचे अधिकारी व सर्व बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.