मोदी सरकारची कोती मनोवृत्ती उघड ; खेलरत्न पुरस्काराच्या नामकरणावर अशोक चव्हाण यांची टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड (राजकिरण देशमुख)
खेलरत्न पुरस्कारातून राजीव गांधींचे नाव वगळल्याने त्यांची महती कमी झालेली नसून, मोदी सरकारची कोती मनोवृत्ती उघडी पडली, अशी बोचरी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारकडे नवनिर्मितीच्या दृष्टीची वाणवा असून, त्यांची कार्यक्षमता केवळ कुत्सित राजकारण करण्याइतपत मर्यादित आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या काळातील योजना असो वा पुरस्कार; राजकीय हेतूने त्यांचे नामकरण करण्याचा एकमेव उद्योग मागील सात वर्षांपासून सुरू आहे. मेजर ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाविषयी कोणाचेही दूमत असण्याचे कारण नाही. त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी एखादा भरीव उपक्रम सुरू करणे मोदी सरकारला सहज शक्य होते. परंतु, त्याऐवजी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या नावे असलेल्या पुरस्काराचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागे मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करण्याचा उदात्त हेतू नसून, राजीव गांधी यांचे नाव हटवण्याचा छुपा अजेंडा आहे. राजीव गांधी हे युवकांचे नेते होते, भारताचे सर्वात तरूण पंतप्रधान होते. नवी दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्या स्पर्धेतून त्यांचे क्रीडा प्रेम व व्यवस्थापन कौशल्य दिसून आले होते. याच स्पर्धेच्या निमित्ताने भारतात रंगीत टीव्हीचे युग सुरू झाले होते. खेळावर प्रेम करणारे तरूण नेते म्हणून खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव संयुक्तिकच होते. मात्र मोदी सरकारने गांधी-नेहरू घराणाच्या द्वेषातून हे नामकरण केले असून, त्यांचा हा द्वेष निंदनीय आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.