जरांगेंचा पुन्हा एल्गार..! ३० मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा, आता काय आहे मागणी..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा समाजाची शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी ३० मे रोजी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे पुन्हा एकदा मोठे आंदोलन आणि बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा केली.
शनिवारी (ता. १६) अंतरवाली सराटी येथे झालेल्या जाहीर बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
या बैठकीत राज्यभरातून मराठा समाजाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, “२९ मेपर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करावे, सातारा, हैदराबाद आणि इतर संस्थानांचे गॅजेट अध्यादेश लागू करावेत, राज्यातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्यावेत, तसेच आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांना महावितरण आणि औद्योगिक क्षेत्रात नोकरी देण्यासाठी अध्यादेश काढावा. सरकारकडे २९ मेपर्यंतची मुदत आहे. याची अंमलबजावणी झाली नाही तर ३० मे रोजी उपोषण आणि मोठे आंदोलन करण्यात येईल.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, “मुंबईत समाज एकवटला होता, त्या वेळी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मग आता आमची प्रमाणपत्रे का रोखली जात आहेत? हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातील मराठा बांधवांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे आणि मराठा समाजाचे मन जिंकावे.”
तसेच, “ज्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांचे प्रमाणपत्र द्यावे, ग्रामपंचायतीमध्ये नोंदी लिहाव्यात, सातारा संस्थानचा अध्यादेश लागू करावा आणि १९९४ च्या धर्तीवर आरक्षणाचा अध्यादेश काढावा,” अशी मागणीही त्यांनी केली. सारथी संस्थेमधील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रखडल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “महामंडळाचे १६०० ते १८०० कोटी रुपये थकले आहेत. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही मंत्र्यांनी एका संघटनेला दोन-दोन कोटी रुपये दिले.” तसेच नेकनूर येथील सरपंचावर ग्रामपंचायत जाळल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून तो गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी केली.
दरम्यान, ३० मे रोजी अंतरवाली सराटीत होणाऱ्या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात असून, बैठकीदरम्यानही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सुनील तटकरे, प्रफुल पटेलांचं राष्ट्रवादीतील भविष्य काय..? पक्षाकडून अखेर खुलासा, रोहित पवारांवर गंभीर आरोप….
निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती ; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार….!
महावितरणचे दोन तुकडे…! महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी स्थापन झाली स्वतंत्र वीज कंपनी….
पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस ; ‘या’ जिल्ह्यांना दिला इशारा…
शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हा दाखल होणार, महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश….
मनोज जरांगेंकडून आंदोलनाची घोषणा, सदावर्ते भडकले, थेट एकनाथ शिंदेंना इशारा, तुम्ही आता….