महाराष्ट्राच्या राजकाणात पुन्हा दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याची चर्चा, नेमकं घडलं काय..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चांचं खंडन केलं होतं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही नेत्यांकडून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, अशी अजित पवार यांची इच्छा होती. तसेच त्यासाठी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या, असा दावा करण्यात आला होता. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी या वृत्ताचं खंडन केलं होतं. यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. पण आता पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य कारण ठरलं आहे. हा नेमका विषय काय आहे ते सविस्तर समजून घेऊयात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं तर ती अभिमानाची बाब असेल, असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अजून वेळ निघून गेलेली नाही, असंही वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
सुनील शेळके नेमकं काय म्हणाले?
“दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्च्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी व्हायला पाहिजेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा होते. तोच मान सुनेत्रा वहिनींना मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती. त्यानंतर सुनेत्रा वहिनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. राज्याच्या उपमुख्यमंत्रीदेखील झाल्या आहेत. सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनी यांचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरण करुन एकत्रपणाने पुढे जात असेल तर आम्हालादेखील त्याचा अभिमान असेल”, असं मोठं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे. सुनील शेळके यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
“आमदार सुनील आण्णा शेळके हे पुणे जिल्ह्यातील प्रभावी नेते आहेत. ते तरुण आमदार आहेत. अजित दादांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी नेहमीच उत्तम पद्धतीने काम केलं आहे. ते मावळ मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी जी काही भावना व्यक्त केली ती व्यक्तीगत होती की त्यांच्याकडे यासंदर्भात काही माहिती होती त्याबाबत मला कल्पना नाही”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
“सुनील आण्णा यांनी जे मत व्यक्त केलं आहे ते त्यांनी सांगितलं आहे. एक नक्की आहे की, अजित पवार यांच्या निधननंतर सुनेत्रा वहिणी यांच्या नेतृत्वात पक्षाचं काम पुढच्या कालावधीत सुरू राहावं. हा निर्णय त्यांच्या सर्वांच्या सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. वहिनी ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कारभार करत आहेत, अतिशय संयमाने, सोशिकतेने, मनावर प्रचंड मोठा आघात झालेला असताना ज्या पद्धतीने जबाबदारी सांभळत आहेत ही बाब आमच्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.
“सुनील शेळके यांनी विलीनीकरणाबाबत म्हटलं आहे, पण विलीनीकरणाबाबत तशी काही चर्चा आहे का? ते मला माहिती नाही. समजा, जर असेल तर त्या संदर्भातील अंतिम निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील”, असंही तटकरे म्हणाले.
दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणावर भाजपचा दबाव आहे का?
“भाजपकडून कधी दबाव राहिलेलाच नाही. कारण ज्यावेळी आम्ही अजित दादांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनी आम्हाला त्या प्रक्रियेत मार्गदर्शन केलं. आमच्या एनडीएमध्ये सहभाग हा देशाचा आणि राज्याच्या प्रगतीमध्ये राहिला. त्यानंतरच्या ज्या घडामोडी झाल्या त्या सर्वांनी पाहिलेल्या आहेत. तो निर्णय अजित दादांनी घेत असताना त्यांच्या निर्णयासोबत आम्ही सर्व जण राहिलो”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
“त्यानंतरच्या कालावधीत भाजप पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच बाबतीत केव्हाच हस्तक्षेप केला नाही. याउलट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाने आम्हाला नेहमीच एक मित्रपक्ष म्हणून सन्मानाची वागणूक दिली. त्यामुळे त्यांचा दबाव या विषयाबाबत कधी नव्हता. राहिला विषय पक्षांतर्गतचा, तर पक्षांतर्गत आमचं कुणाचं काही म्हणण्याचं कारणच नाही. त्यामुळे तसे असेल तर वहिनी या संदर्भातील निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील. या क्षणाला माझ्याकडे या संदर्भातली कुठलीही माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करु इच्छित नाही”, अशी भूमिका तटकरे यांनी मांडली.
“ज्येष्ठ आमदार सुनील तटकरे यांनी कोणत्या मुद्द्यावरुन वक्तव्य केलं आहे ते मला माहिती नाही. त्यांनी मुलाखतीत असताना त्यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असताना वक्तव्य केलं का, मला त्याबाबत माहिती नसल्याने मी त्या विषयावर अधिक भाष्य करु इच्छित नाही”, असं मत सुनील तटकरे यांनी मांडलं.
“सुरुवातीच्या काळात आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतला तो त्यांच्या सहमतीनेच घेतला की, त्या उपमुख्यमंत्री असतील आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी असेल. यानंतर विलीनीकरणाच्या विषयावर पडदाच पूर्णपणाने पडला असल्याने आमचा सुनेत्रा पवार यांच्यासोबत या विषयावर चर्चा करण्याचा मुद्दा कधी आलाच नाही”, अशीदेखील प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…