‘त्यांना पागल कुत्र्यानं चावलं असेल’ : विजय वडेट्टीवार पक्षश्रेष्ठींचा विषयावर भडकले….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मी पक्षश्रेष्ठींची माफी मागितल्याची बातमी पूर्णपणे खोटी असून ती मुद्दाम पसरवण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने ही अफवा पसरवली त्याला पागल कुत्र्याने चावले असावे, अशा तीव्र शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण देत संबंधित दाव्याचा इन्कार केला.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांची माफी मागितल्याची चर्चा समाजमाध्यमांत रंगली होती. मात्र, या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले की, चर्चेचा केंद्रबिंदू ‘ट्रेंड डील’ आणि महाराष्ट्रातील शेतकरी प्रश्न होता. राज्यातील धान, कापूस आणि तूर उत्पादकांवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी आंदोलनाची दिशा काय असावी, यावरही सविस्तर चर्चा झाली. “माफीचा प्रश्नच नव्हता. हा मुद्दाम रचलेला अपप्रचार आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीतील गोंधळामुळे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची चर्चा होती. बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासमोर वडेट्टीवार यांनी पराभवाबद्दल माफी मागितल्याचा दावा काही वृत्तांत करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण देत, “अशी कोणतीही घटना घडलेली नाही,” असे म्हटले.
दरम्यान, आपल्या विरोधात ‘नॅरेटिव्ह’ तयार केला जात आहे का, असा प्रश्न विचारला असता, “ते जनता ठरवेल. मला तसे वाटत नाही,” असे त्यांनी उत्तर दिले.
राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या दाव्याबाबतही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. “त्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. राहुल गांधी यांना विविध मार्गांनी घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे; मात्र ते घाबरणार नाहीत. उलट पंतप्रधानांनाच संसदेतून पळ काढावा लागला,” असा टोला त्यांनी लगावला.
राज्यातील शिक्षण स्थितीवर टीका करताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत २२ हजार शाळा बंद झाल्या असून सुमारे चार हजार शाळांमध्ये शिक्षक नाहीत. “मुंबईत मराठी शाळा राहू नयेत, हेच भाजपचे धोरण दिसते,” असा आरोप त्यांनी केला. भाजप नेत्यांच्या वर्तनावरही त्यांनी टीका केली. “भाजप नेते काहीही करतात तेव्हा ते हिंदुत्ववादी वर्तन ठरते; आम्ही काही केले तर हिंदुत्वविरोधी भूमिका ठरते,” असे ते म्हणाले.
महिला शेतकरी शक्तिपीठाच्या विरोधात आंदोलन करत असल्याचा उल्लेख करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. “शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही, ही बाब सरकारला महत्त्वाची वाटत नाही; मात्र शक्तिपीठाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो,” असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…