लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी मिळणार का…? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काळजी करु नका.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रथेनुसार विरोधकांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. मात्र, या आमंत्रणाला विरोधकांनी बहिष्कार घालत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.
याबाबत नागपूरमध्ये विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवरजोरदार टीका केली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. दरम्यान पत्रकारांनी जेव्हा लाडक्या बहिणींबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार
नागपुरात सोमवारपासून चालू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला विरोधकांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसेच पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या राज्यात शेतकरी त्रस्त आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, बेरोजगारीचाही मुद्दा आहे, असा हल्लाबोल करता यावेळचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत विरोधकांनी दिले. तर विरोधकांच्या या पत्रकार परिषदेलाही फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच उत्तर दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार केला. आम्ही विरोधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ. विरोधकांची पत्रकार परिषद ही निराशेने भरलेले होती, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
शेतकऱ्यांना आम्ही मदत केली आहे, विरोधक अभ्यास न करता बोलत आहेत-फडणवीस
शेतकऱ्यांच्या बाबतीतही विरोधक आरोप करत आहेत. ९२ टक्के शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे. ८ टक्के शेतकऱ्यांचा केवायसीचा प्रश्न आम्ही सोडवतो आहोत. ९० लाखपैकी हे १२ लाख शेतकरी आहेत. त्यापैकी अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांचा प्रश्न आपण सोडवत आहोत. उर्वरित शेतकऱ्यांचा केवायसीचा प्रश्न सोडवल्यावर ते पैसे आपण देणारच आहोत. त्यामुळे विरोधकांनी हे म्हणणं की शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही हे अभ्यास न करता केलेलं विधान आहे. अतिवृष्टीची मदत दिली आहे आणि १० हजारांची वेगळी मदतही आपण दिली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. विरोधी पक्षाकडून जे प्रश्न उपस्थित होतील त्या प्रश्नांना आम्ही समर्पक उत्तर देऊ. शेतीच्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतर प्रश्न असतील आमची उत्तर देण्याची तयारी आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
लाडक्या बहिणींबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पत्रकार परिषदेत पत्रकाराने लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारला. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना निधी वाढवून देऊ असे आश्वासन दिले होते. हे अधिवेशन लाडक्या बहिणींच्या आनंदात भर टाकणारे ठरेल का? असे विचारताच योग्य वेळी योग्य निर्णय होतील. काळजी करू नये, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. फडणवीसांच्या या विधानानंतर लाडक्या बहिणींना सध्यातरी वाढीव आर्थिक मदत मिळणार नाही, असे म्हटले जात आहे. परंतु भविष्यात लाडक्या बहिणींना मिळत असलेल्या लाभात वाढ होऊ शकते, अशी आशा व्यक्त केली जातेय. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….