“अजितदादांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.”, एकनाथ खडसेंची मागणी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ४० एकरावरील जमिनीच्या व्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी, या कंपनीने अंदाजे १,८०० कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या व्यवहारावर फक्त ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी आकारण्यात आल्याचेही उघड झाले आहे.
या जमीन खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे लक्षात येताच राज्य सरकारने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना निलंबित करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सदर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच या व्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
या प्रकरणात एकनाथ खडसे यांनीही आता उडी घेतली आहे. संपूर्ण व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि बनवाबनवी झाल्याचा आरोप खडसेंकडून करण्यात आला आहे. संबंधित जमीन महार वतनाची असल्याने तिच्या खरेदीसाठी महसूल आयुक्तांची पूर्व परवानगी आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात अशी कोणतीही परवानगी घेतल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत असून, तो तात्काळ रद्द करण्याची मागणीही खडसे यांनी केली आहे.
अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीचे भागभांडवल केवळ एक लाख रुपये आहे, मग ३०० कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यासाठी इतका मोठा पैसा संबंधितांकडे कसा आला ? कोणत्या खात्यातून पैसे दिले गेले ? आणि ते पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले ?, असे प्रश्न खडसेंनी उपस्थित केले आहेत. त्या दृष्टीने संपूर्ण तपास करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. जळगावमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
माझ्यावर आरोप करणारे कुठे गेले ?
महसूल मंत्री असताना माझ्या कुटुंबावर बरेच आरोप झाले होते. वास्तविक जमीन खरेदी प्रकरणाशी माझा थेट संबंध नव्हता. तरीही मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचे नाव जमीन खरेदी प्रकरणात समोर आले असतानाही माझ्यावर त्यावेळी आरोप करणारे आता शांत बसले आहेत.
सरकार आपल्या सहकाऱ्याच्या मुलाच्या कंपनीची चौकशी करणार आहे, हे जनतेच्या गळ्याखाली उतरणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्यात यावी. त्या माध्यमातूनच संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होऊन खरे सत्य बाहेर येईल, असे देखील खडसे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर सुमारे ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. आता त्याच पवारांबरोबर ते सत्तेत बसले आहेत. मग त्यांच्या मुलाच्या चौकशीचे काय होणार? असाही सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….