निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारा एक गंभीर आणि थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.
महाराष्ट्रातील मतदार यादीत तब्बल ९६ लाख बोगस (खोटे) मतदार नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत, असा खळबळजनक दावा राज ठाकरे यांनी केला आहे. रविवार, १९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील नेस्को मैदानावर आयोजित मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
‘१ जुलैनंतर ९६ लाख मतदार वाढले’
राज ठाकरे यांनी या आरोपासाठी खात्रीलायक सूत्रांचा हवाला दिला आहे. ते म्हणाले की, “मला असं कळालं की, १ जुलैला निवडणूक आयोगाने मतदारांची यादी बंद केली. त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादीत ९६ लाख खोटे मतदार भरले आहेत, अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.”
ते पुढे म्हणाले की, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रत्येकी आठ ते साडेआठ लाख मतदार ‘घुसवण्यात’ आले आहेत. केवळ शहरेच नव्हे, तर प्रत्येक शहरातील आणि गावातील याद्यांमध्ये हे खोटे मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत.
‘गणित आधीच सेट’ तर मतदानाला काय अर्थ?
सत्ताधारी पक्षांकडून मनसे आणि राज ठाकरेंच्या सभांना होणाऱ्या गर्दीवर टीका केली जाते. ‘राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी होते, पण मतं मिळत नाहीत. त्यांचा एकही आमदार किंवा खासदार नाही,’ असे सत्ताधारी म्हणतात. या टीकेला उत्तर देताना राज ठाकरेंनी आपला हा मोठा आरोप जोडला.
ते म्हणाले, “अशाप्रकारे बोगस मतदार घुसवून निवडणुका घेतल्या जात असतील, तर आमचे आमदार-खासदार कसे निवडून येणार? सत्ताधाऱ्यांकडून मतदार यादीतच गणित ‘सेट’ केले जात आहे. मग तुम्ही मतदान करा नाहीतर नका करू. सामान्य जनतेच्या मतदानाला काय अर्थ उरतो?”
‘निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर संताप’
निवडणूक आयोगावर टीका केल्यास सत्ताधारी लगेच चिडतात, याकडे लक्ष वेधत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. “आम्ही केलेले आरोप त्यांना (सत्ताधाऱ्यांना) मनाला लागतात, म्हणूनच ते बोलत आहेत ना? तुम्हाला राग येतोय कारण तुम्ही शेण खाल्लंय. गल्लीगल्लीत माहिती आहे, कशी सत्ता आली, कसे राजकारण सुरू आहे,” अशा खरमरीत शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.
विजयानंतरही सन्नाटा!
मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राज ठाकरे म्हणाले की, “यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे २३२ आमदार निवडून आले. इतकं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात प्रचंड सन्नाटा होता. कुठेही विजयी मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत, जल्लोष झाला नाही. मतदारही हा निकाल पाहून अवाक झाले. निवडून आलेल्यांनाही कळलं नाही, आपण कसे निवडून आलो. राज ठाकरे यांनी आरोप केला की, मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार घुसवून सत्ताधारी पक्ष स्थानिक पक्षांना संपवत आहेत.
राज ठाकरेंचे आयोगाला आव्हान
हा गंभीर आरोप केल्यानंतर राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे. “जोपर्यंत महाराष्ट्रातील मतदार याद्या साफ होत नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा,” असे थेट आव्हान त्यांनी आयोगाला दिले आहे. या आरोपांमुळे आता निवडणूक आयोगाकडून आणि सत्ताधारी पक्षांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.