राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ ५ महत्त्वाच्या मागण्या…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पावसामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेतीचे आणि मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह शेतातील माती देखील वाहून गेली आहे. शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले आहेत. राज्य सरकारकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. ते पूर्ण झाले की जास्तीत जास्त मदत केली जाईल असे आश्वासन राज्य सरकारकडून दिले जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारला पाच गोष्टी सुचवल्या आहेत.
शरद पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर यासंबंधी पोस्ट केली आहे. राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे. शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपुर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत, असे मी सुचवू इच्छितो, असे शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवारांनी राज्य सरकारने आपत्ती निवारणाची तातडीने केली पाहिजेत अशी पाच कामे यावेळी सांगितली आहेत, ती पुढीलप्रमाणे –
१. पंचनामा प्रक्रीयेसाठी ठरावीक मुदतीचे बंधन नसावे.
अभुतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत उरकणे अशक्य आहे. पंचनाम्यांच्या आधारे नुकसानीचा अहवाल राज्यशासनास सादर केल्यानंतर नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानाची दखल घेतली जात नाही. उदा. अतीवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छप्परांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तू यांची पडझड होते. पाणी ओसरल्यानंतर पिके व पशूधन व इतर बाबींची हानी निदर्शनास येते. अशा नुकसानीचे देखील पंचनामे होऊन आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी.
२. नुकसान भरपाई सोबत पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे.
– वस्तुत: आपदग्रस्तांना दिली जाणारी मदत ही नुकसान भरपाई नसून अंशत: दिलासा असतो. शेतकरी व सामान्य जनता आपत्तीने कोलमडून गेली असल्याने ह्या नुकसान भरपाई सोबतच पुनरूज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा. ह्यात पिकांच्या पुनर्पेरणी व पुनर्लागवडीसाठी विशेष मदत , फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष मदत यांचा समावेश असावा.
– वाहून गेलेली किंवा नापीक झालेली जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करावा. लहान-मोठे बंधारे, सिंचन कालवे, विहिरी, पंपिंग यंत्रणा व इतर सिंचन साधनांची दुरुस्ती व गाळ काढण्याची तसेच शेतकऱ्यांच्या बांध-बंदिस्तीची कामे हाती घ्यावीत. पुनर्बांधणी व पुनरूज्जीवनाची कामे मनरेगा कामांतून कशी होतील, आपदग्रस्तांच्या हातांना काम कसे मिळेल याचे देखील नियोजन करावे.
– शाळा, आरोग्य, वीज, रस्ते व इतर पायाभूत सुविधांच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा तयार करावा. पाऊस कमी झाल्यावर व पूर ओसरल्यानंतर ह्या आराखडयाची अंमलबजावणी तातडीने कशी होईल याकडे लक्ष द्यावे.
३. साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यावा.
अतीवृष्टी आणि पूराने नागरीकांचे संसारपयोगी साहित्य (भांडी, कपडालत्ता, फर्निचर वगैरे) नष्ट झाले आहे. शालेय साहित्य, चारा व शेतीची साधने, व्यवसायिक साहित्य यांची नासधूस झाली आहे. ह्या जंगम वस्तूंचा देखील पुरवठा करण्याचे नियोजन करावे व त्या वेळेत पुरवण्यात याव्यात.
४. शेतकरी हिताचे निर्णय.
– पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथील करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा लाभ मिळेल. खाजगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ व दिरंगाई होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे.
– वित्तीय संस्थांकडून कर्जदार शेतकरी व व्यवसायिक यांच्याकडून होणारी वसूली तात्काळ तहकूब करावी आणि शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.
५. मानसिक व सामाजिक आधार.
– आपत्तीग्रस्तांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत. बाधीत व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, याकडे सत्वर लक्ष द्यावे.
ह्या अभुतपूर्व संकटात शासकीय यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे, जनतेने धीराने घ्यावे. यापूर्वीही अशा संकटांतून मार्ग काढून आपण उभे राहिलो आहोत. तसे यावेळी ही पुन्हा उभे राहू, याचा मला विश्वास आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..