वर्षा गायकवाड विरुद्ध मोहित कंबोज, विरोधकांचा कंबोज यांच्यावर आरोप तर भाजपची आयटी सेल गायकवाडांविरोधात सक्रिय….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सध्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड विरुद्ध भाजप आयटी सेल असा वाद सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळतोय. वर्षा गायकवाड यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर एसआरए प्रोजेक्ट संदर्भात काही आरोप केले.
त्यानंतर भाजपच्या आयटी सेलने वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीच्या विरोधात पत्रा चाळ संदर्भात काही आरोप करायला सुरुवात केली. आता हा वाद एवढा पुढे गेला की यामध्ये काही विरोधकांनी सुद्धा मोहित कंबोज यांना टार्गेट करायला सुरुवात केली.
एकीकडे आता वर्षा गायकवाड यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत असं आव्हान मोहित कंबोज यांनी दिले. तर दुसरीकडे वर्षा गायकवाड यांनी भाजपकडून होणारे आरोप सिद्ध करावेत असं म्हटलंय.
वर्षा गायकवाडांवर आरोप
भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या कंपनीला एसआरएचे प्रकल्प मिळाल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. यानंतर आपल्याविरोधात विरोधात भाजप आयटी सेल अॅक्टिव्ह झाल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. सोशल मीडियावर वर्षा गायकवाड आणि त्यांचे पती यांनी पत्रा चाळमध्ये फ्लॅट लाटल्याचा आरोप भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी केल्याचं सोशल मीडियावर समोर आलं. हा आरोप प्रत्यारोपाचा वाद वाढत गेला.
आरोप सिद्ध करण्याचे गायकवाडांचे आव्हान
वर्षा गायकवाड यांनी एक्स वर पोस्ट करत आपला पत्राचाळ मध्ये फ्लॅट असेल तर ते पुराव्यानिशी उघड करावं असं आव्हान दिलं. शिवाय आपण मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले म्हणून आपल्यावर अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
मोहित कंबोज यांच्यावर विरोधकांचा आरोप
वर्षा गायकवाड यांनी मोहित कंबोज यांच्यावर आरोप केल्यानंतर विरोधकांनी एका मागे एक मोहित कंबोज यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक्स वर टॅग करत मोहित कंबोज यांच्या नावे एसआरएचे 30 प्रकल्प मिळाले हे खरं आहे का विचारलं? तर सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा मोहित कंबोज यांच्या संदर्भात एक्स पोस्ट करत या साऱ्या प्रकल्पांसंदर्भात मुद्दा उपस्थित केला.
सक्रिय राजकारणातून निवृत्ती नाही
या सगळ्या बाबत मोहित कंबोज यांनी अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलं. आपल्याला 30 प्रकल्प एसआरए प्रकल्प मिळालेत याचे पुरावे द्यावेत, अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असं आव्हानच त्यांनी वर्षा गायकवाड यांना दिले. शिवाय आपलं नाव घेऊन अनेक जण प्रसिद्धी मिळवत असल्याचंही मोहित कंबोज यांनी सांगितलं. आपण कुठल्याही प्रकारे अॅक्टिव्ह राजकारणातून संन्यास घेतला नाही असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलं.
मोहित कंबोज आणि विरोधक यांच्यातील सोशल मीडियावरील वाद हा काही नवीन नाही. याआधी सुद्धा अशा प्रकारचा वाद आणि आरोप प्रत्यारोप हे सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. मात्र आता या वादामध्ये वर्षा गायकवाड विरुद्ध मोहित कंबोज आणि भाजप आयटी सेल असा नवा वाद समोर आला.
कंबोज यांनी तर थेट आरोप सिद्ध करावे असं चॅलेंज दिले तर दुसरीकडे आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर सुद्धा वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे हा वाद जाणार का? आणि यासंबंधीचे पुरावे समोर येणार का हे पाहावं लागेल.